बॉश कंपनी देणार रोजगाराभिमुख प्रशिक्षण
By admin | Published: December 22, 2015 02:04 AM2015-12-22T02:04:50+5:302015-12-22T02:04:50+5:30
औद्योगिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावे, यासाठी राज्यातील २४ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व बॉश लिमिटेड या जर्मन कंपनीदरम्यान आज
नागपूर : औद्योगिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावे, यासाठी राज्यातील २४ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व बॉश लिमिटेड या जर्मन कंपनीदरम्यान आज सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत ‘ब्रिज’ हा प्रशिक्षण कार्यक्रम राज्यातील सार्वजनिक-खासगी भागीदारीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राबविण्यात येणार असून, शिक्षण अर्धवट सोडलेल्या युवकांना या प्रशिक्षणाचा फायदा दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत जाहीर केले.
विविध उद्योगांमध्ये रोजगार मिळण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये जसे संवाद कौशल्य, (कम्युनिकेशन स्कील), व्यक्तिमत्त्व विकास, ग्राहक सेवा, स्वयंशिस्त, मुलाखत कौशल्य, औद्योगिक विशेष ज्ञान, इंग्रजी संभाषण कौशल्य, संगणकाची माहिती आदींचा समावेश असलेला दोन महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अभ्यासक्र मासाठी पाच हजार रु पये शुल्क आकारण्यात येणार असून, त्यापैकी ५०० रु पये उमेदवाराने नोंदणी शुल्क म्हणून भरणे आवश्यक आहे. उर्वरित साडेचार हजार रु पये बॉश कंपनीने करार केलेल्या बँकेमार्फत उमेदवारास कर्ज म्हणून देण्यात येणार आहे. तसेच पहिल्या सहा बॅचसाठी अडीच हजार रु पये किमतीचे लर्नर किटही कंपनीमार्फत देण्यात येणार आहे.
जर्मनीतील बॉश ग्रुप कंपनी ही अभियांत्रिकी क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि सेवा पुरविणारी जागतिक कंपनी आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत औद्योगिक प्रशिक्षण संस्था व बॉश कंपनीमध्ये करार करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव एस. एस. संधू, नाशिकच्या आमदार सीमा हिरे, अमरावतीचे आमदार डॉ. सुनील देशमुख, संचालक जे. डी. भुतांगे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली तेव्हा बॉश कंपनीचे महाव्यवस्थापक मोहन पाटील पे्रक्षकदीर्घेत उपस्थित असल्याचा उल्लेख त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)