डोंबिवलीत फेरवाल्यांचे स्टेशन परिसरात पुन्हा बस्तान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 04:48 PM2017-10-21T16:48:57+5:302017-10-21T16:51:54+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांवर खळखट्याकचे आदेश असतांनाही डोंबिवलीत मात्र त्या आदेशाला फाटा देत फेरिवाल्यांनी बस्तान मांडले आहेत.
डोंबिवली- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांवर खळखट्याकचे आदेश असतांनाही डोंबिवलीत मात्र त्या आदेशाला फाटा देत फेरिवाल्यांनी बस्तान मांडले आहेत. स्थानक परिसरातील पाटकर रोडसह डॉ. राथ रोडवर फेरिवाल्यांनी सकाळच्या पहिल्या सत्रात न बसता दुपारपासून बसायला सुरुवात केली. मनसेच्या पदाधिका-यांनी मात्र फेरिवाले नाहीत, आता नाहीत पुढेही बसू देऊ नका, असा इशारा रेल्वेसह महापालिकेच्या अधिका-यांना दिला.
मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत, परिवहनचे सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांच्यासह गटनेते प्रकाश भोईर आदी पदाधिका-यांनी आणि निवडक कार्यकर्त्यांनी स्थानक परिसरात दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पाहणी दौरा केला. त्यावेळी पाटकर आणि राथ रोडवर फेरिवाले नव्हते. तसेच स्थानकातही फेरिवाले नव्हते. त्यामुळे घरत यांनी समाधान व्यक्त करत स्थानक प्रबंधक ओमप्रकाश करोटीया यांची भेट घेतली. त्यांना यासंदर्भात फेरिवाले नसावेत असे सांगितले. तसेच महापालिकेच्या स्कायवॉक परिसरातही फेरिवाले नसल्याने समाधान व्यक्त केले. मात्र मनसे पदाधिका-यांची पाठ फिरताच फेरिवाल्यांनी पुन्हा बस्तान मांडले. दुपारी दोननंतर कमी प्रमाणात फेरिवाले आले, आणि त्यानंतर हळुहळु परिस्थिती जैसे थे झाली होती.