न्यायालयातून पोबारा करणा-या दोन्ही आरोपींना आजन्म कारावास!
By Admin | Published: July 23, 2016 02:01 AM2016-07-23T02:01:38+5:302016-07-23T02:01:38+5:30
शुक्रवारी न्यायालयासमोर पत्करली शरणागती; दोघांसह तिसर्या आरोपीसही जन्मठेप
अकोला: डाबकी रोडवरील प्रिया टॉवरमध्ये २00७ मध्ये घडलेल्या एका खून प्रकरणात दोषी सिद्ध झाल्यानंतर गुरुवारी न्यायालयाच्या आवारातून पोबारा करणार्या दोन्ही आरोपींनी शुक्रवारी न्यायालयासमोरच शरणागती पत्करली. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पोबारा करणार्या दोन आरोपींसह तिघांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. विजय ऊर्फ पिंटू बोंडे, शेखर शर्मा आणि नीलेश परनाटे अशी तीनही आरोपींची नावे आहेत.
बाश्रीटाकळी तालुक्यातील सिंदखेड येथील विनोद काशिराम डोंगरे यांना नऊ आरोपींनी २९ जुलै २00७ रोजी जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या डाबकी रोड भागातील प्रिया टॉवर येथे बेदम मारहाण केली होती. आर्थिक देवाणघेवाणीतून झालेल्या या मारहाणीत विनोद डोंगरे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी विजय पांडुरंग गावंडे रा. सिंदखेड, ता. बाश्रीटाकळी यांच्या फिर्यादीवरून पिंटू ऊर्फ विजय बोंडे, शेखर ओमप्रकाश शर्मा, प्रशांत सुधाकर मोरे, नीलेश विश्वंभर परनाटे, अजय नारायण देवकते, संजय नारायण देवकते, संदीप रवींद्र टेकाडे, मंगेश वामन म्हैसने, संदीप दीपक मोरे यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानानुसार गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. जुने शहर पोलिसांनी प्रकरणाचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच गुरुवार, २१ जुलै रोजी पिंटू बोंडे व नीलेश परनाटे या दोघांना दोषी ठरविताच त्यांनी न्यायालयातून पळ काढला होता; मात्र दुसर्याच दिवशी शुक्रवारी दोन्ही आरोपी न्यायालयासमोर शरण येताच न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने नऊ साक्षीदार तपासल्यानंतर त्यांच्या न्यायालयाने पिंटू ऊर्फ विजय बोंडे, शेखर ओमप्रकाश शर्मा आणि नीलेश परनाटे या तिघांना शुक्रवारी कलम ३0२ आणि १२0 ब अन्वये दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अँड. राजेश्वर ऊर्फ गिरीश देशपांडे यांनी कामकाज पाहिले. (प्रतिनिधी)
-----------------------
सहा आरोपींची निर्दोष मुक्तता
विनोद डोंगरे खून प्रकरणातील तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर पुराव्यांअभावी सहा आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. यामध्ये अजय नारायण देवकते, संजय नारायण देवकते, संदीप रवींद्र टेकाडे, मंगेश वामन म्हैसने, संदीप दीपक मोरे यांचा समावेश आहे.