मुलींच्या विक्रीप्रकरणी दोघांना अटक
By Admin | Published: January 5, 2015 04:41 AM2015-01-05T04:41:23+5:302015-01-05T04:41:23+5:30
गडचांदुरातील अल्पवयीन मुलींची राजस्थान व मध्य प्रदेशात विक्री करून विवाह लावून देण्यात आला होता. गडचांदूर ठाण्यातील
गडचांदूर (जि़चंद्रपूर) : गडचांदुरातील अल्पवयीन मुलींची राजस्थान व मध्य प्रदेशात विक्री करून विवाह लावून देण्यात आला होता. गडचांदूर ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन उईके यांच्या नेतृत्वातील पथकाला सदर प्रकरणाचा शोध घेण्यात यश आले आह़े प्रत्येकी दीड लाखात अल्पवयीन मुलींची विक्री करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी प्रकाश मालवी (४५) आणि शोभा राऊत (४३) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
गडचांदूर येथून ३ डिसेंबर रोजी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या़ याप्रकरणी त्यांच्या पालकांनी मुली बेपत्ता असल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, ५ डिसेंबरला आग्रा रेल्वेस्थानकावरून राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील रूपवास येथे दोघांनी मुलीला नेले. बनीया ऊर्फ राजकुमार जोगी या दलालाच्या मदतीने रूपवास येथील प्रेमसिंग गुर्जर या तरुणाशी एका मुलीचा विवाह लावून देण्यात आला होता. नंतर दुसऱ्या मुलीला शोभा व प्रकाश उज्जैनला आले. प्रकाश हा मुळचा उज्जैनचा असल्याने तेथे त्याची ओळख होती. बोरमुंडला गावातील राहुल मालवी याच्याशी तिचा विवाह लावून देण्यात आला.
या प्रकरणात प्रकाश व शोभा हिने दलालांच्या मदतीने आर्थिक व्यवहार केल्याचेही निष्पन्न झाले आहे. प्रत्येकी एक ते दीड लाखात अल्पवयीन मुलींची विक्री करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव पोलीस तपासात उघड झाले आहे. (प्रतिनिधी)