बेळगावातील दोघे ताब्यात
By admin | Published: December 20, 2015 11:14 PM2015-12-20T23:14:41+5:302015-12-21T00:46:24+5:30
अर्भक विक्री प्रकरण : जत्रेतील नारळ विक्रीच्या नावाखाली करायचे मुलांची चोरी
सावंतवाडी : अर्भक विक्रीप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी बेळगाव पोलिसांच्या मदतीने पकडलेले अब्दुल करीम नदाफ (वय ४२), रूपा रामचंद्र टकले (वय ३६) हे दोघेही पती-पत्नी असल्याचे तपासात पुढे आले आहे. नारळ विक्रीच्या नावाखाली जत्रेत जाऊन लहान मुलांची चोरी करायची आणि ती विकायची असाच धंदा या दोघांचा सुरू होता. त्यातूनच त्यांची आंगणेवाडीच्या जत्रेत शिरोडा येथील भक्तीशी ओळख झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले असून, बेळगाव पोलीस लवकरच भक्तीच्या शोधासाठी सिंधुुुदुर्गमध्ये येणार आहेत.चार दिवसांपूर्वी सावंतवाडीतील बंड्या कोरगावकर यांना बेळगाव येथून एका महिलेचा फोन आला. त्यांनी हा भक्तीचा फोन काय, असे कोरगावकर यांना विचारले. मात्र, कोरगावकर यांनी मी भक्तीचा पती बोलतो, असे सांगितले. त्यानंतर त्या महिलेने आपल्याकडे एक मूल असून ते हवे असल्यास ५ लाख रूपये घेऊन या, असे कोरगावकर यांना सांगितले होते. असे तीन ते चार वेळा याच महिलेचे फोन आल्याने बंड्या कोरगावकर व भाजपच्या महिला तालुकाध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी पोलिसांशी संपर्क साधला होता. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणाची दखल घेत शुक्रवारी बंड्या कोरगावकर यांचे फोन टॅप करण्यात आले होते.
याचवेळी या महिलेचा शुक्रवारी ११ च्या सुमारास फोन आला आणि तिने पुन्हा एकदा कोरगावकर यांना आॅफर दिली. त्यानंतर पोलिसांनी लागलीच तपासाची सूत्रे हलवली. पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांनी आपले एक पथक या तपासासाठी सज्ज केले आणि त्यांना शनिवारी सायंकाळी बेळगाव येथे पाठवण्यात आले. मात्र, पोलिसांनी बेळगाव येथे पोचण्यापूर्वी सर्व खबरदारी घेतली होती. बंड्या कोरगावकर हे आंबोली येथूनच महिलेच्या सतत संपर्कात होते. त्यांनी आपण बेळगाव येथे येत असल्याचे सांगितले. त्यामुळे महिलेने आज तुम्ही या, पण मुलगा आज देणार नाही, उद्या देतो असे त्यांना सांगितले होते.सावंतवाडी पोलीस सायंकाळी बेळगावात पोचल्यानंतर त्यांनी पीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुंभार यांची मदत घेतली. आरोपींना कसे भेटायचे याचे नियोजन केले. ठरल्याप्रमाणे बेळगावात चनम्मा चौकात दोघांचे भेटण्याचे निश्चित झाले. त्यानुसार बंड्या कोरगावकर त्यांना भेटण्यासाठी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गेले. यावेळी रूपा टकले व अब्दुल नदाफ तेथे आले. त्यांची समोरासमोर भेट होताच सावंतवाडी, बेळगाव पोलिसांनी त्या आरोपींना ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)
जत्रोत्सवांत वावर : भक्तीच्या शोधात पोलीस
बेळगाव येथून ताब्यात घेतलेले हे आरोपी बऱ्याच वेळा सिंधुदुर्गमध्ये येऊन गेले होते. त्यांनी सिंधुदुर्गमधील जत्राही केल्या असून ते नारळ विक्रीच्या निमित्ताने जत्रेला यायचे. आपण व्यापारी असल्याचा बहाणा ते करीत असत आणि त्यातूनच ते गिऱ्हाईक शोधत होते, असे बेळगाव पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
यावेळी पोलिसांना टकले व नदाफ या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, शिरोडा येथील भक्ती मालवण येथील आंगणेवाडीच्या जत्रेत आरोपींना भेटली होती. ही दोघेही पतीपत्नी नारळ व्यवसायाच्या निमित्ताने जत्रेत आली होती. आरोपींनी भक्तीची ओळख काढत मुल हवे असल्यास आमच्याकडे आहे, असे सांगितले होते. त्याला भक्तीने होकार दिल्यानेच आरोपी सतत भक्तीच्या संपर्कात होते. मात्र, त्यांचा नेम चुकला आणि तो राँग नंबर बंड्या कोरगावकर यांना लागल्याने अखेर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला.
पंढरपूरातून मुले आणून सिंधुदुर्गात विक्री
दोन्ही आरोपी सराईत असून मूळ बेळगाव येथीलच राहणारे आहेत. दोघेही मोठमोठ्या जत्रा करतात आणि मुले चोरतात. त्यांचे काही साथीदार पंढरपूर येथे असून त्यांना तेथून मुले पुरवली जातात. याची माहिती या आरोपींनी बेळगाव पोलिसांना दिली असून, बेळगाव पोलीस पंढरपूर येथे गेले आहेत. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत यामध्ये आणखी कोण सापडले नसल्याचे पोलीस उपनिरीक्षक कुंभार यानी सांगितले.
विधानसभेत हंगामा
कर्नाटकमधून सतत मुलांचे अपहरण, विक्री यामुळे कर्नाटक विधानसभेत हंगामा होत होता. यामुळे कर्नाटक पोलिसांची तपास यंत्रणा गोंधळात सापडली होती. मात्र, शनिवारी दोघेही सापडल्याने यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला. आरोपींची बेळगाव येथील पीएमसी पोलीस ठाण्यात येऊन आयुक्त एस. रवी या
ंनी चौकशी केली. यावेळी कर्नाटक गुन्हा अन्वेषण विभागाचे उपायुक्त मंजुनाथ रेड्डी उपस्थित होते.
राँग नंबरमुळे गुन्हा घडला असून या प्रकरणी बेळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे सावंतवाडी पोलीस स्वतंंत्र गुन्हा दाखल करणार नसल्याने आरोपींचा ताबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
- रणजीत देसाई, पोलीस निरीक्षक
अर्भक प्रकरणातील आरोपी पकडले असले तरी मूल कोणाला हवे होते, याचा तपास करणे गरजेचे असल्याने आरोपींना घेऊन सिंधुदुर्गमध्ये येणार असून, भक्तीचा शोध घेणार आहे.
- कुंभार, उपनिरीक्षक,
बेळगाव
पोलीस आयुक्तांकडून कोरगावकर यांचे अभिनंदन
मुलांच्या अपहरणामुळे कर्नाटक विधानसभेत हंगामा झाल्यानंतर पोलिसांनी सर्वत्र तपासाची चक्रे फिरवली. मात्र, त्यांना यश आले नव्हते. पण बंड्या कोरगावकर यांच्या समयसुचकतेमुळे दोन्ही आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे बेळगाव पोलीस आयुक्त एस. रवी यांनी बंड्या कोरगावकर यांचे खास अभिनंदन केले.