दोघा भावांनी काढला ४५ फूट विहिरीतील गाळ
By admin | Published: May 16, 2016 05:06 AM2016-05-16T05:06:58+5:302016-05-16T05:06:58+5:30
दोघा भावांनी कोणत्याही यंंत्राशिवाय महिनाभर परिश्रम घेऊन ४५ फूट विहिरीमधील दहा फूट गाळ काढला.
मानाजी धुमाळ,
सांगली-दुष्काळी परिस्थितीमध्ये रेठरेधरण (ता. वाळवा, जि. सांगली) येथील दोघा भावांनी कोणत्याही यंंत्राशिवाय महिनाभर परिश्रम घेऊन ४५ फूट विहिरीमधील दहा फूट गाळ काढला. शिवाय तो स्वत:च डोकीवरून वाहून विहिरीबाहेर टाकला.
उत्तम व हणमंत पंडित पाटील अशी त्यांची नावे आहेत. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर कुटुंबाची व शेतीची जबाबदारी खांद्यावर पडलेल्या पाटील बंधूंनी कष्टाच्या जोरावर शेती फुलवली. शेतीमध्ये उत्पन्न निघाले नसल्यामुळे आणि दुष्काळामुळे काम नसल्याने त्यांनी विहिरीमधील गाळ यारीच्या साहाय्याने काढण्याऐवजी स्वत:च काढण्याचा निर्णय घेतला.
सकाळी सहा ते दुपारी एक व दुपारी तीन तास विश्रांती घेऊन पुन्हा दुपारी चार ते सायंकाळी सातपर्यंत श्रम करून टिकाव, खोरे व पाट्यांच्या साहाय्याने विहिरीमधील गाळ बाहेर काढला. विहिरीमध्ये सुरुवातीला दोन ते तीन फूट पाणी होते. त्यामुळे बादलीच्या साहाय्याने पाणी विहिरीबाहेर टाकले. एका महिन्यात सुमारे १० फूट म्हणजे साधारणत: १४ ट्रॉली गाळ उपसण्यात दोघांना यश आले.