दोन्ही कॉँग्रेस-शिवसेना एकत्र येणार?
By admin | Published: March 11, 2017 12:28 AM2017-03-11T00:28:28+5:302017-03-11T00:28:28+5:30
जिल्हा परिषदेचे सत्ताकारण; तिन्ही पक्षांना दोन पदे देण्याचा फॉर्म्युला; सत्तेसाठी शिवसेनेचे कार्यकर्ते आग्रही
राजाराम लोंढे -- कोल्हापूर --जिल्हा परिषदेतील सत्तेचा गुंता सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व शिवसेना एकत्रित येण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. तिन्ही पक्षांना दोन-दोन पदे देण्याचा फॉर्म्युलाही पुढे आला असून, कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेनेच पुढाकार घेतल्याचे सूत्रांकडून समजते.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एक सोडाच, पण दोन पक्षांना बहुमताचा आकडा गाठता आला नसल्याने सत्तेचा गुंता वाढला आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादीचे सत्तेचे गणित जुळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही कॉँग्रेसचे २५ सदस्य होतात. त्यांना आणखी नऊ सदस्यांची गरज आहे. यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या शाहू आघाडीचे दोन, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी आघाडीचे दोन, ‘स्वाभिमानी’चे दोन व एक अपक्ष अशी गोळाबेरीज केली तरी सत्तेची गाडी ३२ वरच अडते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘भाजता’च्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले असून, त्यांचे संख्याबळ २३ पर्यंत जाते. ‘युवक क्रांती’चे दोन सदस्य आपल्या बाजूनेच राहतील, असा दोन्ही बाजूंनी दावा केला जात आहे. शिवसेनेने पत्ते न खोलल्याने कॉँग्रेस व भाजप आशावादी आहेत.
मुंबई महापालिकेच्या सत्तासंघर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक होते; पण मुंबईतील तिढा सोडविण्यात चंद्रकांतदादा पाटील यांची भूिमका महत्त्वाची ठरली असून, या बदल्यात राज्यभर शिवसेना व भाजप एकत्र येईल, अशी आशा पाटील यांना आहे. तसा प्रस्तावही पुढे येत आहे; पण शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची मानसिकता पाहिली तर हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र येतील, असे वाटत नाही. तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला असून, वरिष्ठ पातळीवरूनच स्थानिक नेत्यांना आघाडीबाबतचा संकेत आल्याचे समजते. त्या दृष्टीने स्थानिक नेत्यांनी जोडण्या सुरू केल्या आहेत.
नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील भाजपची मुसंडी पाहता, आगामी काळात दोन्ही कॉँग्रेसबरोबर शिवसेनेसमोरील अडचणी वाढणार हे निश्चित आहे. दोन्ही कॉँग्रेसने ‘हबकी’ डाव टाकल्याने मुंबई महापालिकेत भाजपला सत्तेपासून रोखण्यात शिवसेना यशस्वी झाली. उर्वरित जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही कॉँग्रेस व शिवसेनेमध्ये अंतर्गत वेगवान घडामोडी सुरू आहेत. कोल्हापूरचा विचार करायचा झाल्यास येथे शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. ‘भाजता’ला रोखण्यासाठी दोन्ही कॉँग्रेसना बाहेरून पाठिंबा द्यायचा की पदाधिकारी निवडीवेळी सभागृहात अनुपस्थित राहायचे? असे दोन प्रवाह चर्चेला पुढे आले आहेत; पण सत्तेच्या सारीपाटात शिवसेना जर ‘किंगमेकर’ असेल तर सत्ता का सोडायची? असा एक प्रवाह पुढे आला असून, सर्वच स्थानिक नेते या पर्यायावर आग्रही असल्याचे समजते.
अध्यक्ष, उपाध्यक्ष यांसह चार विषय समित्यांचे सभापती अशी सत्तेची सहा पदे आहेत. सत्तेची वाटणीच करायची म्हटल्यास सर्वाधिक सदस्य असलेल्या कॉँग्रेसचा अध्यक्ष होणार हे निश्चित आहे. बांधकाम सभापतिपदावर राष्ट्रवादी व शिवसेनेचा दावा राहू शकतो. संख्याबळापेक्षा सत्तेचे गणित सोडविण्यासाठी दोन्ही कॉँग्रेस शिवसेनेची कोणतीही मागणी खाली पडू देणार नाहीत. त्यामुळे शिवसेनेला बांधकाम समिती देऊन उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या पदरात पडू शकते. उर्वरित विषय समिती प्रत्येकाला एक मिळू शकते.
...तर कामे करता येतील
शिवसेना राज्य व केंद्रात सत्तेत आहे; पण देवस्थान समितीचे सदस्यपद वगळता एकाही कार्यकर्त्याला महत्त्वाचे पद मिळालेले नाही; त्यामुळे आमदारांसह कार्यकर्तेही नाराज आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेत सत्तेत जाऊन कार्यकर्त्यांची कामे तरी करता येतील, असा एक प्रवाह आहे.
सेना नेत्यांची दमछाक होणार
शिवसेनेत पदासाठी अर्धा डझन इच्छुक आहेत. पहिल्या टप्प्यात दोघांनाच संधी मिळू शकते. त्यामुळे पदांची वाटणी करताना नेत्यांची चांगलीच दमछाक होणार आहे.
उद्या होणार भूमिका स्पष्ट
उद्या, रविवारी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी बारा वाजता ते शासकीय विश्रामधामवर बैठक घेणार आहेत. त्यास सहा आमदार, तीन जिल्हाप्रमुख व सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक उपस्थित राहणार आहेत. स्थानिक राजकारण आणि राज्यातील शिवसेनेची वाटचाल या दोन्ही पातळ््यांवर चर्चा होऊन जिल्हा परिषदेतील सत्तेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
दावेदार असे : कॉँग्रेस : राहुल पाटील, बजरंग पाटील, बंडा माने.
राष्ट्रवादी : युवराज पाटील, सतीश पाटील, जयवंतराव शिंपी.
शिवसेना : अमरीश घाटगे, हंबीरराव पाटील, सर्जेराव पाटील, स्वरूपाराणी जाधव (शाहू आघाडी)