ठाणे मनपात दोन्ही काँग्रेसची आघाडी शक्य
By Admin | Published: January 20, 2017 12:07 AM2017-01-20T00:07:22+5:302017-01-20T00:07:22+5:30
जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांमध्ये समविचारी पक्षांची आघाडी केली पाहिजे
मुंबई : जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांमध्ये समविचारी पक्षांची आघाडी केली पाहिजे यावर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे एकमत झाल्याचे सांगून बीड, लातूर, हिंगोली, नांदेड, जालना, बुलडाणा, यवतमाळ, जळगाव, अहमदनगर, पुणे आणि ठिकाणी आघाडीची बोलणी सुरु असून ठाण्यात आघाडीसाठी चार बैठका झाल्या व तेथे आघाडी नक्की होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नावाखाली दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांना स्वत:कडे घेऊन भाजपा- शिवसेनेने शुध्दीकरण मोहीम सुरु केलीच आहे. त्यामुळे त्या दोन्ही पक्षातील वर्षानुवर्षे काम करणारे कार्यकर्ते, नेते मनापासून आनंदी आहेत. त्यामुळे त्यांनी अवश्य युती करावी, म्हणजे आमचाही मार्ग मोकळा होईल, असे चिमटेही तटकरे यांनी काढले. राष्ट्रवादीची पार्लमेंटरी कमिटीची बैठक गुरुवारी मुंबईत झाली. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील आदींसह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)