दोन्ही मंत्र्यांचे माझ्यावर जास्तच प्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 12:38 AM2017-05-14T00:38:36+5:302017-05-14T00:38:36+5:30

परदेशात जाताना मीच विजय शिवतारे व दिलीप कांबळे या जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांना शहराच्या कचरा प्रश्नात लक्ष घालण्याबाबत सांगितले होते.

Both the ministers love me more | दोन्ही मंत्र्यांचे माझ्यावर जास्तच प्रेम

दोन्ही मंत्र्यांचे माझ्यावर जास्तच प्रेम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : परदेशात जाताना मीच विजय शिवतारे व दिलीप कांबळे या जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांना शहराच्या कचरा प्रश्नात लक्ष घालण्याबाबत सांगितले होते. त्यांचे बहुधा ‘जास्त प्रेम’ असावे, त्यामुळे त्यांनी जास्तच लक्ष घातले अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी कचरा विषयात दोन्ही मंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. परदेशातूनही मी या विषयावर लक्ष ठेवून होतो, आता आल्यावर पूर्ण लक्ष देत आहे, असे ते म्हणाले.
शहरात कचराप्रश्न पेटला असताना बापट परदेश दौऱ्यावर होते. याबाबत विचारले असता बापट म्हणाले, की कचऱ्यावर प्रक्रिया करणारे लहान प्रकल्प प्रभागांमध्ये सुरू करण्याची कल्पना माझीच होती. आता प्रत्येक प्रभागात असे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कचऱ्यात कागद व प्लॅस्टिक याचे प्रमाण जास्त असते. ते वेगळे केले तरी कचऱ्याचे प्रमाण कमी होईल.
पुण्यात सध्या तरी पाणी कपातीचा मुळीच विचार नाही, असे बापट यांनी स्पष्ट केले. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन केले आहे. त्यात फारसा बदल होणार नाही. शेतीसाठीचे आवर्तन सुरू असले तरी त्यातून फार पाणी संपणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली. कॅनॉलच्या गळती व अन्य कामांसाठी ५ कोटी रुपयांच्या आतील खर्च करण्यास स्थानिकस्तरावर परवानगी द्यावी, असा प्रस्ताव सरकारला दिला आहे.
परदेशात सरकारी खर्चाने गेला नाही असे सांगताना बापट म्हणाले, ‘‘जगातील अनेक देशांचा मिळून एक फंड आहे. त्यातून अशा दौऱ्यांचा खर्च होत असतो. गेली २ वर्षे संसदीय कामकाजमंत्री म्हणून काम पाहत आहे. अन्य देशांमधील या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी दौरा केला. नियोजित दौरा ऐनवेळी रद्द करता येत नाही, त्यामुळेच दोन्ही मंत्र्यांना कचऱ्याच्या समस्येत लक्ष द्या, असे सांगितले होते.’’
कचरा डेपोवर कॅपिंगच्या सूचना
फुरसुंगी व उरुळी येथील ग्रामस्थांबरोबरही चर्चा करणार आहे. त्यांच्या मागण्या योग्य आहेत. त्यांचा दूषित पाणी तसेच आरोग्याचा प्रश्न सोडवला जाईल. तेथील डेपोवर कॅपिंग करण्याबाबतही महापालिकेला सूचना दिल्या आहेत. ते कामही होईल. रविवारी (दि. १४) काही कचरा प्रक्रिया प्रकल्पांना भेट देणार आहे. त्यांची कार्यक्षमता वाढवण्याबाबत काय करता येईल, याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे बापट म्हणाले.

Web Title: Both the ministers love me more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.