शस्त्र बाळगणारे दोघे अटकेत
By admin | Published: March 3, 2017 02:42 AM2017-03-03T02:42:07+5:302017-03-03T02:42:07+5:30
खंडणी व अपहरणाचे गुन्हे दाखल असलेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.
नवी मुंबई : खंडणी व अपहरणाचे गुन्हे दाखल असलेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी कट्ट्यांसह ५ अग्निशस्त्रे व काडतुसे हस्तगत करण्यात आली असून दोघेही आरोपी मूळचे उत्तरप्रदेशमधील रहिवासी आहेत.
सूरज शरदमन यादव व कृष्णा काशिराम यादव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट १ चे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांना दोन आरोपी अग्निशस्त्रांसह महापे एमआयडीसी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली बनसोडे, अविनाश माने यांच्या पथकाने एमआयडीसीतील एल अॅण्ड टी कंपनीसमोर सापळा रचला होता. या ठिकाणी हे दोघे आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेण्यात आली. त्यांच्याकडे १ रिव्हॉल्वर, १ पिस्तूल व ३ गावठी कट्टे सापडले आहेत. याशिवाय ८ जिवंत काडतुसेही सापडली आहेत. या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सद्यस्थितीमध्ये उल्हासनगर व टिटवाळा येथे राहणारे असून मूळचे उत्तरप्रदेशमधील सिद्धार्थनगर येथील रहिवासी आहेत. अटक केलेल्या आरोपींपैकी सूरज यादवविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात खून व अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. कृष्णा यादवविरोधात अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये खंडणी व अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत.
अटक केलेल्या आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. त्यांनी अग्निशस्त्र कशासाठी आणले होते, अग्निशस्त्राची तस्करी करत आहेत का व या गुन्ह्यांमध्ये अजून कोणाचा समावेश आहे का याचीही चौकशी केली जात आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, उपआयुक्त दिलीप सावंत, सहायक आयुक्त नितीन कौसाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. या कारवाईमध्ये दीपक पाटील, विवेक कठाळे, बाबाजी थोरात, ज्ञानदेव इंगुळकर, विनायक मेळावणे, जितेंद्र पाटील, विनायक कंखरे, जालिंदर गायकर, संतोष मिसाळ, सचिन दहीफळे व इतरांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)