दोघांची बिबट्याशी झुंज, शेतकरी बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 06:21 PM2018-01-14T18:21:10+5:302018-01-14T18:22:01+5:30

बिबट्याच्या जबड्यात ‘त्याचा’ एक हात फसलेला, रक्तबंबाळ झालेला..., तर ‘त्याने’ दुस-या हाताने बिबट्याची नरडी करकचून पकडलेली..., कधी बिबट त्याच्या नरडीचा घोट घेण्यासाठी चवताळलेला..., तर कधी ‘तो’ जीव वाचविण्याच्या आकांताने आपल्या पंजाने संपूर्ण ताकदीनिशी स्वत:ची सुटका करण्यासाठी धडपडणारा...

Both of them fought with a leopard, the farmer escaped | दोघांची बिबट्याशी झुंज, शेतकरी बचावले

दोघांची बिबट्याशी झुंज, शेतकरी बचावले

Next

- अभय लांजेवार
उमरेड (जि. नागपूर) : बिबट्याच्या जबड्यात ‘त्याचा’ एक हात फसलेला, रक्तबंबाळ झालेला..., तर ‘त्याने’ दुस-या हाताने बिबट्याची नरडी करकचून पकडलेली..., कधी बिबट त्याच्या नरडीचा घोट घेण्यासाठी चवताळलेला..., तर कधी ‘तो’ जीव वाचविण्याच्या आकांताने आपल्या पंजाने संपूर्ण ताकदीनिशी स्वत:ची सुटका करण्यासाठी धडपडणारा..., अशातच त्याचा चुलतभाऊ मदतीला धावला. त्याने कु-हाडीने त्या बिबट्यावर वार केले अन् अंगाचा थरकाप उडविणा-या या अर्ध्या तासाच्या झुंजीत बिबट ठार झाला. चित्रपटात बघायला मिळणारे हे दृश्य रुपेरी पडद्यावरील नसून, ते उमरेड तालुक्यातील (जिल्हा नागपूर) लोहारा शिवारातील आहे.

लोहारा हे गाव उमरेड शहरापासून १२ किमी अंतरावर असून, संपूर्ण शिवार जंगलाने वेढलेला आहे. वनविभागाच्या संरक्षित परिसरातील लोहारा (पांढर) तलावालगत असलेल्या रवींद्र ठाकरे (रा. लोहारा, ता. उमरेड) यांच्या शेतात हा थरार रविवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडला. यात रवींद्र भाऊराव ठाकरे (४५, रा. लोहारा, ता. उमरेड) व त्यांचा चुलतभाऊ राजेंद्र देवराव ठाकरे (रा. खुर्सापार, ता. उमरेड) या दोन शेतक-यांनी बिबट्याशी दोन हात करीत स्वत:चा जीव वाचविला. जीव वाचविण्याच्या या झटापटीत बिबट मात्र ठार झाला. यात दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

या झुंजीत रवींद्रच्या कमरेला व मांडीला तर राजेंद्र यांच्या हात व पायाला जबर दुखापत झाली आहे. ठार झालेल्या बिबट हा अंदाजे साडेतीन वर्षे वयाचा होता. त्याच्या शरीरावर कु-हाडीच्या तीन ठिकाणी जखमा होत्या. घटनास्थळालगत असलेल्या लोहारा नर्सरीमध्ये त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी घटनास्थळी वनविभागाचे क्षेत्रसहाय्यक एस. एम. हत्तीठेले, बीटगार्ड अलका रोहाड हजर होते. विशेष म्हणजे, ठाकरे बंधूनींच या प्रकाराबाबतची सूचना वनविभागाला दिली होती.
---
‘ती’ पंधरा मिनिटे
रवींद्र ठाकरे हे त्यांच्या शेतात जागली (पिकांची रखवाली) करायला गेले होते. सकाळ जाग आल्यानंतर ते बैल बांधायला गेले. त्याचवेळी दडून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झेप घेतली. रवींद्रनेही जोरदार प्रतिकार करत बिबट्याला खाली पाडले आणि बिबट्याची मान काखेतही दाबली. अंदाजे १५ ते २० मिनिटांच्या या फ्रिस्टाईलमध्ये बिबट्याने माघार घेतली व तो परत गेला. त्यांनीही थोड्या अंतरावर येत दम घेतला. पाणी प्यायल्यानंतर त्यांनी आरडाओरड करीत परिसरातील शेतक-यांना आवाज दिला. यात रवींद्र जखमी झाले. ही झुंज १५ मिनिटे चालली.
---
बिबट पुन्हा छातीवर...
आरडाओरडा ऐकताच काही शेतक-यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. रवींद्रने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यांचा चुलतभाऊ राजेंद्रही तिथे आला. काही वेळाने ते बांधलेले बैल सोडायला गेले असता, त्याच बिबट्याने त्यांच्यावर पुन्हा हल्ला केला. यावेळी बिबट राजेंद्रच्या छातीवरच बिबट चढला होता. पुन्हा जोरदार फ्रिस्टाईल सुरू झाली. राजेंद्रचा एक हात बिबट्याच्या जबड्यात होता. दुस-या हाताने त्यांनी बिबट्याची नरडी घट्ट पकडून ठेवली होती. अशातच भावाचा जीव वाचविण्यासाठी रवींद्रने बिबट्यावर कु-हाडीने वार केले. यात बिबट गतप्राण झाला.
---
‘त्या’ तिघांचा थरकाप
हा थरार तिघांनी काही फुटावरून आपल्या डोळ्यात साठवून ठेवला. विजय जाधव, साजीद चालेकर व पक्षवान शंभरकर अशी या तीन तरुणांची नावे आहेत. आम्ही हा संपूर्ण प्रसंग आमनेसामने बघितला, असे विजय जाधव म्हणाला. कु-हाडीचा पहिला वार खाली जाताच बिबट्याने रवींद्रचे जॅकेट पकडले. त्यात जॅकेट फाटले. रवींद्रने बिबट्याला जोरात ढकलले. अशातच बिबट्याने राजेंद्रवर उडी मारली. दोघांचाही जीव गेला असता, परंतु दोघांच्याही जिगरबाजीने मोठा अनर्थ टळला. आमच्याकडेही अधूनमधसून बिबट जोर मारत होता, असेही विजयने लोकमतला सांगितले.

Web Title: Both of them fought with a leopard, the farmer escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.