‘ती’च्या नोकरीची महती दोन्ही पिढ्यांना कळली!
By admin | Published: December 15, 2014 09:07 PM2014-12-15T21:07:10+5:302014-12-16T00:02:08+5:30
विवाहित तरुणी परीक्षागृहात : आजीबाई मात्र दंग बाहेर नातवंडे सांभाळण्यात...
सातारा : पूर्वी लेकी-सुनांनी शिक्षणासाठी बाहेर पडायचे म्हटले तरी दिव्य मानले जायचे. लग्नानंतर तर शिकून या काय करणार? असा सूर सासरची मंडळी हमखास आळवायची! आता मात्र लेकी-सुनांच्या नोकरीची महती जुन्या अन् नव्या पिढीला कळू लागली आहे. लेकी-सुना परीक्षेसाठी वर्गात गेल्यानंतर या आजीबाई बाहेर नातवंडे सांभाळण्यात दंग असल्याचे सुखद चित्र रविवारी साताऱ्यात पाहायला मिळाले.
रविवारी शहरातील सुमारे १६ केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) झाली. सुमारे नऊ हजार परीक्षार्थींनी दोन टप्प्यांत ही परीक्षा दिली. महिला उमेदवार परीक्षा देण्यासाठी गेल्यावर कुटुंबातील सदस्यांना लहान मुलांना सांभाळावे लागले.
‘चूल आणि मूल’ ही चौकट तोडणे महिलांसाठी किती अवघड होते, याची झलक अडीच दशकांपूर्वी स्मिता पाटील यांच्या ‘उंबरठा’ या चित्रपटातून पाहायला मिळाली होती. अलीकडेही एकाच्या पगारात संसाराचा गाडा हाकणे अशक्य असल्याचे जवळपास सर्वच मध्यमवर्गीय लोकांच्या लक्षात आले आहे. म्हणूनच शिक्षणाचा योग्य उपयोग करून संसाराला हातभार लावण्यासाठी सुनांना घराबाहेर जाण्याची मुभा दिल्याचे जवळपास सर्वच कुटुंबांमध्ये पाहायला मिळत आहे. असं म्हणतात की, ज्येष्ठ मंडळी आपल्या मतांमध्ये वयोमानानुसार बदल करत नाहीत; पण विचारांच्या क्रांतीत अग्रेसर असलेल्या साताऱ्यातील ज्येष्ठांनी हा समज खोटा ठरविला आहे. आयुष्यभर चूल आणि मूल करणाऱ्या अनेक सासू आता सुनेने परीक्षा देऊन नोकरी करावी, ही इच्छा बाळगतात आणि त्यासाठी कृतिशील सहभाग नोंदवत आपल्या सुनेच्या नोकरीचा खंबीर पायाही रचून
देतात. (प्रतिनिधी)
बदलाचे द्योतक
कोणत्याही प्रसंगी महिलांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून तीला आधार दिल्याचे चित्र या निमित्ताने दिसून येत आहे. हे चित्र आता एक प्रकारे बदलाचे द्योतकच म्हणावे लागेल.
आमचं शिक्षण कमी होतं म्हणून आयुष्यभर आम्ही चूल आणि मूल एवढचं केलं; पण आता शिकलेली सून घरात असताना तिनं बी आमच्यासारखंच राहावं हे काय पटणं, म्हणून तिला शिक्षणाला बाहिर पाठवलं. परीक्षा दिऊन तिनं नोकरी करावी, आम्ही म्हातारी माणसं नातवंडं सांभाळायला सक्षम हाय की.
- मंगलाबाई काटकर, कोंडवे
पतींचाही सक्रिय सहभाग
पत्नी नोकरीला लागली तर तिच्या आज्ञात राहावे लागेल, ही पुरुषांची पूर्वीची मानसिकता आता बदलताना दिसत आहे. म्हणूनच पत्नीची परीक्षा सुरू असताना मुलांना सांभाळण्यात दंग असलेले पती बदलत्या सकारात्मक मानसिकतेचे द्योेतक आहेत.
सातारा येथे रविवारी पार पडलेल्या टीईटीच्या परिक्षेदरम्यान पहिल्यांदाच सुखद चित्र पहावयास मिळाले. पत्नी परिक्षेत व्यस्त असताना मात्र कोणाचा पती तर कोणाची सासू तर कोणाचा भाऊ लहानग्यांची परीक्षा केंद्राबाहेर पुरेपूर काळजी घेताना दिसून आले.