गतिमंद महिलेच्या हत्येप्रकरणी दोघे अटकेत
By admin | Published: April 26, 2016 02:37 AM2016-04-26T02:37:46+5:302016-04-26T02:37:46+5:30
गतिमंद महिलेच्या हत्येप्रकरणी मालवणी पोलिसांनी सोमवारी दोघांना अटक केली. सुरेश तनवार (२०) आणि महेंद्र धनीय (३४) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
मुंबई : मालवणी येथे गेल्या शुक्रवारी झालेल्या एका गतिमंद महिलेच्या हत्येप्रकरणी मालवणी पोलिसांनी सोमवारी दोघांना अटक केली. सुरेश तनवार (२०) आणि महेंद्र धनीय (३४) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
मालवणीच्या जुलियसवाडी झोपडीपट्टी परिसरात गीता पाटणकर (७५) या त्यांची विधवा आणि गतिमंद मुलगी ऊर्मिला राजेश कदम (३२) तसेच त्यांचा नातू राजू (८) यांच्यासोबत वास्तव्यास आहेत. तर आरोपी तनवार आणि धनीय हे मालवणी चर्च परिसरात मेणबत्त्या विकण्याचे काम करतात. पाटणकर आणि कदम या याच ठिकाणी साफसफाई करण्याचे काम करीत होत्या.
काही दिवसांपूर्वी या दोघींची भेट तनवार आणि धनीय यांच्याशी झाली. त्यावेळी ४५ हजारांत चांगल्या ठिकाणी झोपडी घेऊन देण्याचे आमिष त्यांनी या दोघींना दाखविले. त्यांच्या आमिषाला बळी पडून या दोघींनी त्यांनी जमा केलेली रक्कम या दोघांना दिली. मात्र त्यानंतर या दोघांनी त्यांना टाळण्यास सुरुवात केली. तसेच झोपडीही घेऊन दिली नाही. त्यामुळे अखेर कंटाळून कदम यांनी पैसे परत मागितले. शिवाय पोलिसांत तक्रार करू, असेही सांगितले. यावर आरोपींनी कदम यांचा काटा काढण्याचे ठरवले.
२२ एप्रिल रोजी रात्री एकच्या सुमारास हे दोघे कदमच्या घरी गेले आणि त्यांनी गळा दाबून तिची हत्या केली. तसेच पाटणकर यांनाही धमकावले. मात्र मुलीचे अंत्यसंस्कार उरकल्यानंतर पाटणकर यांनी सोमवारी सकाळी याप्रकरणी मालवणी पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीनंतर या दोघांना पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपींना २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)