बेकायदा शस्त्र प्रकरणी महिलेसह दोघांना अटक
By admin | Published: October 6, 2016 05:26 PM2016-10-06T17:26:39+5:302016-10-06T17:26:39+5:30
फरासखाना पोलिसांनी खब-यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत एका महिलेसह दोघाजणांना अटक केली असून या दोघांकडून एकूण पाच
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 06 - फरासखाना पोलिसांनी खब-यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत एका महिलेसह दोघाजणांना अटक केली असून या दोघांकडून एकूण पाच पिस्तूलांसह ११ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यामध्ये येरवडा कारागृहात असलेल्या पतीला सोडवण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी बेकायदा शस्त्र विक्रीचा प्रयत्न आरोपी महिलेने केला, असल्याची माहिती परिमंडल एकचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.
पद्मा शिवाजी जाधव (वय ३०, रा. गोकुळनगर, कात्रज कोंढवा रस्ता), इफ्तिकार मुश्ताक अत्तार (वय २५, रा. अवसरी बुद्रुक, मंचर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांना शस्त्र पुरवणारा फारुख (रा. मध्यप्रदेश) याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलिसांच्या तपास पथकाचे पोलीस कर्मचारी सागर केकाण यांना खब-याने आरोपी महिला शस्त्र विक्रीसाठी मंगळवार पेठेत येणार असल्याची माहिती दिली होती. वरिष्ठ निरीक्षक रेखा साळुंखे, निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र चव्हाण यांच्या सुचनांनुसार, सहायक निरीक्षक महेंद्र जाधव, सागर केकाण, अमेय रसाळ, संजय गायकवाड, बापू खुटवड, ज्ञानेश्वर देवकर, ईकबाल शेख, विनायक शिंदे, संदीप पाटील, बाबासाहेब गिरे, शंकर कुंभार, अमोल सरडे, हर्षल शिंदे यांच्या पथकाने सापळा लावला.
मंगळवार पेठेतील श्रीकृष्ण चौकामध्ये दुचाकीवरुन आलेल्या पद्मा आणि अत्तारला ताब्यात घेण्यात आले. पद्माच्या दुचाकीची झडती घेतली असता डिकीमध्ये देशी बनावटीचे तीन पिस्तूले आणि 8 जिवंत काडतुसे मिळून आली. तर अत्तारच्या अंगझडतीमध्ये दोन पिस्तुले आणि ३ जिवंत काडतुसे आढळून आली. ही सर्व शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पद्माचा पती गणेश बबन खैरमोडे (रा. शनि मंदिरामागे, बिबवेवाडी) याच्यावर दत्तवाडी आणि सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यामध्ये तो एक वर्षापासून येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. त्याला सोडवण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करायची असल्याने पिस्तुलाची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचे पद्माने तपासादरम्यान सांगितले आहे. अत्तारच्या ओळखीच्या फारुख याच्याकडून ही शस्त्रे आणण्यात आली होती. ही कारवाई उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त प्रवीण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
काही दिवसांपुर्वी गुन्हे शाखेने शस्त्र तस्करीप्रकरणी जेनीबाई नावाच्या महिलेला अटक केली होती. आता पद्माला अटक झाल्यामुळे महिलांचा बेकायदा शस्त्र तस्करीतील सहभाग वाढत असल्याचे दिसत आहे.