डॉक्टरांवरचे हल्ले रोखणार बाउन्सर्स, स्वसंरक्षणासाठी एजन्सीची नियुक्ती, २ जुलैपासून सेवा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 07:10 AM2023-06-23T07:10:18+5:302023-06-23T07:10:28+5:30
हल्ल्याचे वृत्त कळताच सहा ते १६ मिनिटांत बाउन्सर घटनास्थळी दाखल होतील.
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून डॉक्टरांवरील हल्ल्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. या हल्ल्यांना चाप लावण्यासाठी कायद्याची निर्मितीही करण्यात आली आहे. मात्र, तरीही हल्ले काही थांबत नाहीत. आता यावर उपाय म्हणून डॉक्टरांनी स्वत:च्या बचावासाठी बाउन्सर्सची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एका खासगी संस्थेची मदत घेण्यात आली असून, २ जुलैपासून ही सेवा सुरू होणार आहे. हल्ल्याचे वृत्त कळताच सहा ते १६ मिनिटांत बाउन्सर घटनास्थळी दाखल होतील.
मुंबईतील सुपर स्पेशालिटी डॉक्टरांच्या असोसिएशन ऑफ कन्सल्टंटस् (एएमसी) या संघटनेने खासगी बाउन्सर देणाऱ्या संस्थेशी वर्षभरासाठी करार केला असून, या संस्थेकडे १०० ॲम्ब्युलन्सही आहेत. वेळप्रसंगी डॉक्टर वा त्यांच्या कुटुंबीयांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. अनेकदा डॉक्टरांनी कामात केलेली कुचराई, वैद्यकीय उपचारात निष्काळजीपणा, अतिरिक्त बिल आकारणी, तसेच रुग्णांशी किंवा नातेवाइकांशी व्यवस्थित न बोलणे आदी कारणांवरून डॉक्टरांना मारहाण केली जाते. त्यात डॉक्टर जखमी होण्याबरोबरच त्यांच्या हॉस्पिटल्सचीही मोडतोड केली जाते. या सर्वांपासून वाचण्यासाठी राज्यात डॉक्टरांच्या हल्ल्याविरोधात महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय संस्था कायदा २०१०, तयार करण्यात आला आहे.
या कायद्यान्वये डॉक्टरांना संरक्षण देण्यात आले असून, रुग्णालयाच्या झालेल्या नुकसानभरपाईची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, कायदा झाल्यनंतरसुद्धा डॉक्टरांवर हल्ला झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मे २०२१ मध्ये उच्च न्यायालयाला शासनाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात डॉक्टर्स, नर्सेस, हॉस्पिटल व क्लिनिकवर झालेल्या हल्ल्याच्या अनुषंगाने सन २०१६ ते एप्रिल २०२१ पर्यंत एकूण ६३६ गुन्हे दाखल आहेत.
असोसिएशन ऑफ कन्सल्टंट (एएमसी) संघटनेत सर्व एमडी, एमएस कविता तत्सम शिक्षण घेतलेले डॉक्टर या संघटनेचे सदस्य असून, यामध्ये मुंबई महानगर परिसरातील १३००० डॉक्टरांचा समावेश आहे. २०१४ साली डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्यानंतर संघटनेने एका खासगी संस्थेला बाउन्सर सेवा पुरविण्याचे काम दिले होते. मात्र, २०१४ ते २०२० मध्ये हे काम चालले. त्यानंतर ही संस्था कोरोनाकाळात बंद पडली. त्याच संस्थेमधून बाहेर पडून काही लोकांनी पुन्हा ही सुविधा पुन्हा सुरू केली आहे.
- डॉ. सुधीर नाईक, मेडिको लीगल कमिटी-अध्यक्ष, असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट
डॉक्टरांवर हल्ला झाल्यास तत्काळ मदत मिळण्यासाठी या संस्थेशी करार करण्यात आला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार फोन आल्यापासून ६ ते १६ मिनिटांत त्याठिकाणी त्यांची माणसे घटनास्थळी पोहोचतील. यासाठी डॉक्टर्सना लवकरच हेल्पलाइन नंबर देणार आहे, तसेच डॉक्टरांना स्वतःला कधी किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याला इमर्जन्सी ॲम्ब्युलन्सची गरज भासल्यास ते या सुविधेचा फायदा लाभ शकतात. सध्या तरी या सुविधेचा खर्च आमची संघटना करणार आहे. २ जुलैपासून ही सेवा कार्यान्वित होणार आहे.
- डॉ. अशोक शुक्ला,
अध्यक्ष, असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट