अल्पवयीन मुलाला कार चालवू देणे पडले महाग
By admin | Published: August 21, 2016 02:14 AM2016-08-21T02:14:26+5:302016-08-21T02:14:26+5:30
परवाना नसतानाही कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना उच्च न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. गेल्या वर्षी या मुलाच्या हातून अपघात झाला होता. त्यात
मुंबई : परवाना नसतानाही कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना उच्च न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. गेल्या वर्षी या मुलाच्या हातून अपघात झाला होता. त्यात कारच्या मागील सीटवर बसलेल्या त्याच्या मित्राला गंभीर दुखापत झाली होती. गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर रोजी हा अपघात झाला होता. त्याची कार दुभाजकावर आदळून हा अपघात झाला होता. या प्रकरणी कार चालवणाऱ्या मुलावर वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. मात्र, दोन्ही मुलांच्या पालकांनी सामंजस्याने मार्ग काढत एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. ‘सामान्य परिस्थितीत आम्ही दंड न ठोठावताच एफआयआर रद्द करण्याचा आदेश दिला असता. मात्र ही केस अस्वस्थ करणारी आहे,’ असे उच्च न्यायालयाने म्हटले.
‘कारच्या मालकांनी म्हणजेच मुलाच्या वडिलांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाला चारचाकी चालवण्याची परवानगी दिली. त्यामुळे प्रतिवादीच्या अल्पवयीन मुलाला गंभीर दुखापत झाली. सरकारी वकिलांनी व्यक्त केलेल्या भीतीशी आम्ही सहमत आहोत. या अशा प्रकारामुळे एखाद्या पादचाऱ्याचा किंवा अन्य वाहनाचा अपघात होऊ शकला असता. परंतु, सुदैवाने असे काही झाले नाही. पण समाजात संदेश जाणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही मुलाच्या वडिलांना ५० हजार रुपये दंड ठोठवत आहोत. दंडाची रक्कम त्यांनी दोन आठवड्यांत मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णायल व कॅन्सर संशोधन संस्थेकडे जमा करावी,’ असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. (प्रतिनिधी)