वा-यावर सोडलेल्या मुलाला पोटगी
By admin | Published: November 6, 2014 03:24 AM2014-11-06T03:24:55+5:302014-11-06T03:24:55+5:30
हुंड्यासाठी झालेल्या छळातून पत्नीचा भाजून मृत्यू झाल्यानंतर, तिच्यापासून झालेल्या मुलाला वाऱ्यावर सोडून गेलेल्या पित्याने त्या मुलाला दरमहा १० हजार रुपये पोटगी द्यावी,
मुंबई : हुंड्यासाठी झालेल्या छळातून पत्नीचा भाजून मृत्यू झाल्यानंतर, तिच्यापासून झालेल्या मुलाला वाऱ्यावर सोडून गेलेल्या पित्याने त्या मुलाला दरमहा १० हजार रुपये पोटगी द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
आईचा मृत्यू झाला तेव्हा हा मुलगा जेमतेम तीन वर्षांचा होता. त्याला आपल्यासोबत न देता त्याचे वडील राजस्थानला गावाकडे निघून गेले. तेव्हापासून गेली १२ वर्षे त्याचा सांभाळ व पालनपोषण मुंबईतील त्याचा मामा करीत आहे. (या प्रकरणातील मुलगा अल्पवयीन आहे. त्यास भावी आयुष्यात त्रास होऊ नये यासाठी बातमीत त्याचे, त्याच्या वडिलांचे अथवा मामाचे नाव दिलेले नाही)
खरे तर मुलाची जबाबदारी वडिलांनी घ्यायला हवी. परंतु ते त्याच्याकडे ढुंकूनही पाहात नाहीत. इतकी वर्षे भाच्याला आपण सांभाळले व शाळेतही घातले. पण स्वत:चे कुटुंब सांभाळण्याखेरीज भाच्याची जबाबदारी पेलणे कठीण जात आहे. त्यामुळे त्याच्या वडिंलाना दरमहा खर्ची द्यायला सांगावी, असा अर्ज या मुलाच्या वतीने मामाने केला होता. त्यावर वांद्रे येथील कुटुंब न्यायालयाने वडिलांनी मुलासाठी दरमहा दोन हजार रुपये पोटगी द्यावी, असा आदेश कुटुंब न्यायालयाने आॅक्टोबर २००८ मध्ये दिला होता.
याविरुद्ध भाच्याच्या वतीने मामाने केलेले अपील मंजूर करून न्या. अभय ओक व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने पोटगीची रक्कम दोनवरून १० हजार रुपये अशी वाढविण्याचा आदेश दिला. पोटगीची २००८ पासूनची वाढीव रक्कम एक महिन्यात द्यावी व नोव्हेंबरपासूनची पोटगीची रक्कम दरमहा सात तारखेपर्यंत मुलाच्या बँक खात्यात थेट जमा करावी,असा आदेशही दिला गेला.
या मुलाचे वडील मुळचे राजस्थानमधील नाथव्दार येथील आहेत. तेथे त्यांची साड्या व कपड्यांची दोन दुकाने आहेत. शिवाय ते कमिशन एजन्टचाही धंदा करतात. त्यांची साम्पत्तीक स्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने १० हजार रुपये ही पोटगीची रक्कम ठरविली. नाथव्दार येथील दुकाने आपली नाहीत, तर आपल्या वडिलांची आहेत व तेथे आपण नोकर म्हणून काम करतो व त्याबद्दल आपल्याला दरमहा जेमतेम दोन हजार रुपये पगार मिळतो, हा मुलाच्या वडिलांनी केलेला दावा खंडपीठाने अमान्य केला.
मुलाच्या वडिलांनी विविध न्प्रकरणात उत्पन्न व सांम्पत्तीक स्थिती याविषयी निरनिराळी आकडेवारी दिली आहे. किंबहुना मुलाला पोटगी द्यावी लागू नये यासाठी पित्याने कुटुंब न्यायालयात खोटी माहिती दिली होती. (विशेष प्रतिनिधी)