आई गावाला, वडील कामावर; घरात मुलानं केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 05:19 PM2021-05-29T17:19:35+5:302021-05-29T17:29:39+5:30
Suicide In Jalgaon : मोबाईलच सांगणार कारण, हरिविठ्ठल नगरातील घटना
जळगाव : आई आणि भाऊ गावाला तर वडील रात्रपाळीच्या ड्युटीला असताना रितेश गुलाबराव मोरे (वय १७) या अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शनिवारी सकाळी हरिविठ्ठल नगरात रितेश यानं आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. रितेश याच्या आत्महत्येचे कारण अजून तरी समजलेले नाही, मात्र लॉ़क असलेल्या मोबाईलमधूनच काही तरी धागेदोरे मिळतील, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश हा पाण्याचे जार वाटप करण्याचे काम करायचा. शहरातील एका महाविद्यालयतही त्याने प्रवेश घेतला होता. वडील गुलाबराव सुकलाल मोरे एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. शुक्रवारी त्याची आई व भाऊ असे दोघेजण धुळे येथे नातेवाईकांकडे गेले होते. तर वडील रात्रपाळीसाठी ड्युटीवर गेले होते. शुक्रवारी रात्री रितेश हा एकटाच घरी होता. त्याने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी सात वाजता वडील गुलाबराव मोरे हे ड्युटीवरुन घरी आले, तेंव्हा रितेश आतून काहीच प्रतिसाद देत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शेजारी राहणाऱ्यांना बोलावून घेत घराचा दरवाजा तोडला असता रितेश गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. ही घटना पाहून वडील गुलाबराव मोरे यांना जबर धक्का बसला.
दरम्यान, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे प्रवीण जगदाळे व मनोज वानखेडे यांनी नागरीकांच्या मदती रितेश याला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यास मृत घोषित केले. शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी दोन वाजता पिंपळकोळा (ता. एरंडोल) या मूळ गावी रितेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत रितेश याच्या पश्चात आई-वडील, एक विवाहित बहिण व लहान भाऊ आकाश असा परिवार आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मोबाईलचं लॉक उघडेना
दरम्यान या घटनेनंतर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच रितेश याने काही सुसाईड नोट लिहिली आहे का यासाठी त्याचे खिसे तसेच इतर ठिकाणी तपासणी केली मात्र तसं काहीच मिळाले नाही. मोबाईल आढळून आला मात्र तो लॉक होता, तो उघडण्याचा प्रयत्न केला असता त्यात अपयश आले. या मोबाईलमधूनच धागेदोरे मिळतील अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.