सोशल मीडियामुळे मुलगा सापडला, पालकांकडे सुखरूप परत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 12:27 AM2018-11-07T00:27:49+5:302018-11-07T00:28:38+5:30
सोशल मीडियाचा वापर नुकसानकारक असे बोलले जाते. मात्र चांगल्या कामासाठी प्रभावीपणे वापरला तर तो अनुभव सुखदच ठरतो.
चाकण - सोशल मीडियाचा वापर नुकसानकारक असे बोलले जाते. मात्र चांगल्या कामासाठी प्रभावीपणे वापरला तर तो अनुभव सुखदच ठरतो. चाकण पोलीस ठाण्यातील कर्मचारी व पत्रकारांना आज याचे प्रत्यंतर मिळाले. खराबवाडीतून हरविलेला पाच वर्षांचा शाळकरी मुलगा पोलीस व पत्रकार यांच्या सतर्कतेमुळे व व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सहकार्याने पालकांकडे सुखरूप सोपविण्यात आला.
चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औद्योगिक वसाहत असणाऱ्या खराबवाडी (ता. खेड) येथून घरातून दुपारी एक वाजणेच्या दरम्यान धीरज रामराव साळुंखे हा पाच वर्षांचा मुलगा बाहेर खेळत असताना फिरत फिरत चाकण चौकात आला. भानावर आल्यावर त्याला आपण कोठे आलो हे समजेना. रडवेल्या अवस्थेत आलेल्या या मुलाला दोन तरुणांनी विचारपूस करून चाकण पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस ठाण्यात कामानिमित्त येणा-या पत्रकारांना पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब डुबे, कोकाटे व तृप्ती गायकवाड यांनी वरील मुलगा चाकण चौकात चुकला असल्याचे सांगितले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून परिसरात याबाबत माहिती देऊन मुलाच्या पालकांना कळविण्याचा प्रयत्न करा, अशी विनंती केली. पत्रकारांनी मुलाचा फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांत या बालकाच्या पालकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आम्ही मुलास घेण्यास येत आहोत, असे कळविले.
पोलीस ठाण्यात आल्यानंतर धीरजने आई-बाबांना बघून त्यांच्याकडे धाव घेतली. आवश्यक कागदपत्रांची शहानिशा करून धीरजला त्याच्या पालकांकडे सोपविण्यात आले. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, सहायक पोलीस निरीक्षक भाऊ डुबे, कोकाटे, पासलकर, महिला पोलीस शिपाई तृप्ती गायकवाड, पोलीस शिपाई खेडकर यांनी याबाबत सहकार्य केले.
दिवसभर कामाचा ताण असतानासुद्धा या बालकाला त्याच्या आईवडिलांकडे देताना आपल्या चांगल्या कामाची पावती निश्चितच मिळते याचा आनंद सर्वांच्या चेह-यावर दिसत होता.