नववीत नापास झालेल्या मुलाने दहावीत मिळवले 90 टक्के
By admin | Published: June 15, 2017 09:02 AM2017-06-15T09:02:56+5:302017-06-15T09:02:56+5:30
विद्यार्थ्यांनी आत्महत्या करुन आयुष्य संपवल्याच्या बातम्या आपण रोज वाचत असताना एक वेगळी सकरात्मक दृष्टीकोन देणारी बातमी समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - नापास होण्याच्या भितीने, नापास झाल्यामुळे किंवा कमी टक्केवारी मिळाली म्हणून विद्यार्थ्यांनी आत्महत्या करुन आयुष्य संपवल्याच्या बातम्या आपण रोज वाचत असताना एक वेगळी सकरात्मक दृष्टीकोन देणारी बातमी समोर आली आहे. विक्रोळीत राहणा-या अनिकेत उदादे (17) या मुलाने रात्रीची नोकरी करुन दहावीच्या शालांत परीक्षेत 90.2 टक्के गुण मिळवले. महत्वाचे म्हणजे अनिकेत 9 वी मध्ये नापास झाला होता.
अनिकेत वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायात काम करतो. त्याच्याकडे ऐरोली ते विक्रोळी या पट्ट्यातील वर्तमानपत्र विक्रेत्यांकडे पेपर पोहोचवण्याची जबाबदारी आहे. मध्यरात्री ते पहाटे चार वाजेपर्यंत वेगवेगळया विक्रेत्यांकडे वर्तमानपत्र पोहोचवण्याचे अनिकेतचे काम चालायचे. खरतर अंगमेहनत, कष्टाचे हे काम करुनही अनिकेतने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. नवव्या इयत्तेत नापास झाल्यानंतर कुटुंबियांनी त्याला शिक्षण सोडून नोकरी करण्यास सांगितले. जेणेकरुन घरखर्चाला हातभार लागेल. त्यानुसार त्याने वर्तमानपत्र पोहोचवण्याची नोकरी सुरु केली.
आणखी वाचा
पण त्याचवेळी त्याने शिक्षणात खंड पडू दिला नाही. त्याने विक्रोळीत रात्र महाविद्यालयात प्रवेश घेतला. रात्री नोकरी, दिवसा अभ्यास असा त्याचा दिनक्रम असायचा. शिक्षण माणसाचे आयुष्य बदलून टाकते यावर अनिकेतचा विश्वास असल्यामुळे त्याने शिक्षण अर्ध्यावर सोडले नाही. नापास झाल्यानंतरही तो पुन्हा जिद्दीने उभा राहिला आणि स्वप्नांचा पाठलाग सुरु ठेवला. दहावीच्या परीक्षेत त्याने 85 टक्के गुण मिळवण्याचे लक्ष्य ठेवले होते.
अनिकेतचे वडिल टेलर असून त्यांच्या कुटुंबात फारसे कोणी उच्चशिक्षित नाही. भारताचे दिवंगत राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ अब्दुल कलाम अनिकेतचे रोलमॉडेल असून, त्यांच्या आत्मचरित्राने अनिकेतला शिकण्याची प्रेरणा दिली. त्याला एरोनॉटिकल इंजिनीयरींगमध्ये करीयर करण्याची इच्छा आहे.
पुण्यात राहणा-या रेखा चौरेची कहाणी सुद्धा अशीच. लवकरच लग्न झाल्यामुळे रेखाला तिचे शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले होते. पण कुटुंबाने दिलेल्या पाठिंब्यामुळे रेखाने तिचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. कालच दहावी शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला. रेखा एसएससी बोर्डाची ही परीक्षा 72 टक्के गुणांनी उर्तीण झाली. शाळा सोडल्यानंतर तब्बल 20 वर्षांनी रेखा दहावीची परीक्षा उर्तीण झाली.