सेलिब्रिटी दहीहंडीवर बहिष्कार टाका
By admin | Published: July 8, 2017 04:23 AM2017-07-08T04:23:18+5:302017-07-08T04:23:18+5:30
दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा व्हावा, अशीच सर्वांची भूमिका आहे. मात्र, दहीहंडीच्या नावाखाली डीजे लावणे, चित्रपट कलाकारांचे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा व्हावा, अशीच सर्वांची भूमिका आहे. मात्र, दहीहंडीच्या नावाखाली डीजे लावणे, चित्रपट कलाकारांचे डान्स, तमाशा आणि सेलिब्रिटींचेच प्रस्थ वाढले आहे. दहीहंडीचे बाजारीकरण थांबविण्यासाठी अशा आयोजकांवर गोविंदा पथकांनीच बहिष्कार टाकावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दहीहंडी समन्वय समितीला केले आहे.
न्यायालयाने दहीहंडीची उंची व गोविंदांच्या वयाबाबत निर्बंध घातले होते. त्याला ‘जय जवान’ पथकाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवर १० जुलै रोजी सुनावणी आहे. या याचिकेच्या अनुषंगाने दहीहंडी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर, समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज ‘कृष्णकुंज’ येथे मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. आयोजनावर आलेले निर्बंध व न्कायदेशीर लढाईची माहिती समितीने राज ठाकरे यांना दिली. यावर, उत्सवांचे बाजारीकरण थांबवा, मग आयोजनांवर कुणीच हरकत घेणार नाही, असा सल्ला राज यांनी दिला.
उत्सवात डीजे, लाउडस्पीकर, सेलिब्रिटीज नकोत. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात ती साजरी व्हावी. धांगडधिंग्याला प्राधान्य देणाऱ्यांच्या हंड्या फोडू नका, असे आवाहन समितीने गोविंदा पथकांना करावे, अशी सूचना राज यांनी केली. राज यांची भूमिका समितीला पटली आहे. लवकरच अन्य घटकांशी चर्चा करून, अधिकृत भूमिका मांडण्यात येईल, असे समन्वय समितीचे सरचिटणीस कमलेश भाईर यांनी सांगितले.