सोलापुरात पशुहत्या करण्यास विरोध करणाऱ्या कुटुंबावर बहिष्कार
By Admin | Published: August 4, 2016 10:30 AM2016-08-04T10:30:22+5:302016-08-04T10:33:17+5:30
सोलापूर येथील मार्डी गावात मरीआई-लक्ष्मीआईच्या यात्रेत पशुहत्या करण्यास विरोध करणाऱ्या तरुणांसह कुटुंबावर बहिष्कार घातला आहे.
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ४ - सोलापूर येथील मार्डी गावात मरीआई-लक्ष्मीआईच्या यात्रेत पशुहत्या करण्यास विरोध करणाऱ्या तरुणांसह कुटुंबावर बहिष्कार घातला आहे. रमेश बापूराव पाटोळे असे या तरुणाचे नाव असून गावकऱ्यांनी त्याच्या कुटुंबाला वाळीत टाकले आहे. वाळीत टाकल्यामुळे त्यांच्यावर गावकऱ्यांनी पीठ, मीठ, पाणी अशा गोष्टींचा बहिष्कार घातल्याचे समोर येऊ लागले आहे. या कुटुंबात बापूराव, राहीबाई, महेश, रमेश आणि वहिनी असे पाच सदस्य आहेत. समाजाकडून आपल्या कुटुंबाची होणारी फरफट थांबविण्यासाठी रमेशने पोलीस ठाण्यात आपल्या समाजाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावात येथील प्राथमिक शाळेजवळ मरीआई-लक्ष्मीआईचे मंदिर आहे. गटारी अमावस्येला येथे यात्रा भरते. यावेळी मोठ्या प्रमाणात पशुंचा बळी दिला जातो. हे थांबण्यासाठी रमेशने सन २०१४ मध्ये पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दिला होता. त्यावेळी येथील यात्रेत पशुहत्या थांबली. मात्र, संपूर्ण दलित समाजाने रमेशच्या कुटुंबाला वाळीत टाकण्याच्या निर्णय घेतला.
त्यामुळे रमेशने आपली तक्रार अर्ज मागे घेतला. त्यानंतर २०१५ मध्ये या यात्रेत पुन्हा पशुबळी दिले. दोन दिवसापूर्वी झालेल्या गटारी अमावस्येच्या यात्रेत प्रशासनाने हस्तक्षेप केल्याने गावकऱ्यांना पशुबळी देता आला नाही. या प्रकाराला रमेश पाटोळे जबाबदार असणार, असा संशय घेण्यात आला. त्यानुसार त्याच्यासह कुटुंबावरही बहिष्कार घातला आहे. त्यांच्यावर बहिष्कार घातल्याने गावकरी त्यांना कोणत्याही कार्यक्रमात सहभागी करून घेत नाहीत.
त्यांच्या समाजातील सुवाशिणी कार्यक्रमासाठी राहीबाई पाटोळे यांना बोलावण्यात आले होते. रिवाजाप्रमाणे त्यांच्या कपाळी मुंडावळे बांधण्यात आले. वाजंत्री वाजत देवाला जाणार इतक्यात राहिबाई यांना वाळीत टाकल्याची गोष्ट देवकार्य करणाऱ्या प्रमुखाच्या लक्षात आली. त्याने त्या कार्यक्रमातून राहीबाई पाटोळे यांना बाजूला काढले. यामुळे आपल्याच समाजाकडून आपल्या कुटुंबाची होणारी फरफट थांबाविण्याचा निर्णय रमेशने घेतला आहे.