शिवसेनेचा मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार
By Admin | Published: November 26, 2015 03:10 AM2015-11-26T03:10:37+5:302015-11-26T03:10:37+5:30
राज्यातील सत्तेत भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याची आपली अलीकडेच सुरु केलेली परंपरा कायम राखली.
भिवंडी : राज्यातील सत्तेत भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याची आपली अलीकडेच सुरु केलेली परंपरा कायम राखली. बुधवारी केवळ शिवसेनाच नव्हे तर काँग्रेस, समाजवादी पार्टी यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. तर एमआयएमने काळे झेंडे दाखविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांना टोले हाणताना विरोधाने शहराचा विकास होत नाही, अशा कानपिचक्या दिल्या.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एमएमआरडीए) वंजारपट्टीनाका येथे बांधलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन आणि राजीव गांधी चौक ते कल्याण रोड, साईबाबा मंदिरापर्यंत होणाऱ्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतील प्रचारात भाजपा व शिवसेनेत झालेल्या वाकयुद्धामुळे दोन्ही पक्षात निर्माण झालेली कटुता कमी झालेली नाही.
यापूर्वीही ठाणे ग्रामीण पोलिसांच्या फिर्यादींना मुद्देमाल हस्तांतर करण्याच्या घाणेकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमातही शिवसनेने बहिष्कार टाकला होता. केडीएमसीत युती झाल्यानंतर दोन्ही पक्षांतील दुरावा संपल्याचे दिसत असतांनाच बुधवारी शिवसेनेने बहिष्कार टाकल्याने युतीत कटूता कायम असल्याचे दिसून आले. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या भूमिपूजनापाठोपाठ लंडन येथील घर ताब्यात घेण्याच्या कार्यक्रमातही शिवसेनेला डावलण्यात आले होते. याशिवाय ठाणे जिल्ह्यातील अनेक विकास प्रकल्पांना एमएमआरडीएने कात्री लावली आहे किंवा त्यात बदल केला आहे, या संघर्षाच्या नाराजीची किनारही या बहिष्कारमागे असल्याचे सांगण्यात येत आहे. याच कार्यक्रमात विकासकामे होत नसल्याचे कारण पुढे करून एमआयएमने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले.