बहिष्कार, गावबंदी अन् उपोषण; आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक जिल्ह्यांत मराठा समाज पुन्हा आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 05:53 AM2023-10-26T05:53:43+5:302023-10-26T05:54:23+5:30
मनोज जरांगे यांना पाठिंबा म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यांत मराठा समाजबांधवांकडून आंदोलने करण्यात येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शासनाला दिलेल्या ४० दिवसांच्या मुदतीत मराठा आरक्षण जाहीर झालेले नसल्याने आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारपासून पुन्हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यांत मराठा समाजबांधवांकडून आंदोलने करण्यात येत आहेत.
उड्डाणपुलाखाली साखळी उपोषण
हिंगोली/अहमदनगर : राज्य सरकारने आश्वासन देऊन एक महिना उलटून गेला तरीही मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटला नाही. त्यामुळे कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा फाटा येथील उड्डाणपुलाखाली मंगळवारपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव, जामखेड, अहमदनगर, श्रीरामपूर येथेही बुधवारपासून साखळी उपोषण सुरू झाले.
पंढरपूर : २५ गावांत नेत्यांना बंदी
पंढरपूर : तालुक्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने जोर धरलेला असून, मागील चार दिवसांत २५ गावांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवेश बंदी जाहीर केलेली आहे. वाखरी येथे गुरुवारपासून साखळी उपोषण केले जाणार आहे. आरक्षण मिळेपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.
आरक्षण नाही तर निवडणूक नाही; ३४ उमेदवारी अर्ज मागे
वझूर, ताडकळस (जि. परभणी) : मराठा आरक्षणासाठी पूर्णा तालुक्यातील वझूरच्या ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. यामध्ये अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच्या सर्व ३४ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. मराठा समाजाला आरक्षण नाही, तोपर्यंत निवडणूक नाही, असा निर्धार केला.
युवक चढला टॉवरवर
खर्डा (जि. अहमदनगर) : आरक्षण मागणीसाठी खर्डा (ता. जामखेड) येथील संतोष साबळे या युवकाने मोबाइल कंपनीच्या टॉवरवर चढून बुधवारी ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाची धांदल उडाली.
३०० फूट उंच टॉवरवर उपोषण
करमाड (छत्रपती संभाजीनगर): शेकटा येथील ३०० फूट उंच मोबाइल टॉवरवर चढून बुधवारपासून प्रहारचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आरक्षणाच्या पहिल्या टप्प्यातही याच टॉवरवर त्यांनी ३० तासांचे उपोषण केले होते.
तीन मुलांच्या पित्याने मृत्यूला कवटाळले
ईट (जि. धाराशिव) : ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’ अशी चिठ्ठी खिशात ठेवून बुधवारी दुपारी भूम (ता. निपाणी) येथे तीन मुलांच्या पित्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रवीण काकासाहेब घाेडके (३६) असे त्यांचे नाव आहे. गेवराई बाजार (ता. बदनापूर) येथे मंगळवारी रात्री जयराम कान्हेरे (३२) याने आत्महत्येचा प्रयत्न केला. परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आकाश वैजनाथराव शिंदे (३०) याने हाताची नस कापून घेत बुधवारी आत्महत्येचा प्रयत्न केला.
...ते काय आरक्षण देणार?
मराठा समाजाला आरक्षण देणारच म्हणणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खुर्ची राहील की नाही याची खात्री नाही. त्यामुळे ते काय आरक्षण देणार?, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीकास्त्र सोडले आहे. सरकार आरक्षणाबाबत गंभीर नाही हे पुन्हा एकदा दिसून आल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, यात जे काही न्यायिक आणि तांत्रिक अडचण आहे, ती दूर कशी करायची, यासाठी सरकारमधील तिन्ही पक्षांचे चिंतन मंथन सुरू आहे. - प्रफुल पटेल, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस.