प्रेमी युगुलाने केली आत्महत्या,प्रेयसीच्या घरात लावला गळफास
By admin | Published: February 17, 2017 01:16 AM2017-02-17T01:16:42+5:302017-02-17T01:16:42+5:30
पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमी युगुलाने गळफास लावून आत्महत्या,गुरुवारी रात्री उघडकीस आलेल्या या घटनेने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 17 - लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमी युगुलाने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी रात्री उघडकीस आलेल्या या घटनेने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दिपीका दिलीप सिंग (वय १८) आणि सोनू हबिब शेख (वय २१) असे मृत प्रेमीयुगुलाचे नाव आहे.
दिपीका तिच्या आईसह लकडगंजमधील भाऊराव नगरात नामदेव वानखेडे यांच्या घरी भाड्याने राहायची. तिचे दोन भाऊ पुण्याला नोकरी करतात. तर, सोनू आधी सतरंजीपु-यात राहत होता. सध्या त्याचे कुटुंब पारडीतील सुभाननगरात राहते. सोनूच्या भावाचा वाहतूक व्यवसाय आहे.
दिपीका आणि सोनूचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. ते नेहमीच सोबत फिरायला जायचे. ते दोघांच्या कुटुंबीयांनाही माहित होते. दिपीका तिच्या आईला अजिबात ऐकत नव्हती. रोज रोज होणारे वाद टाळण्यासाठी आईने तिला बोलणे सोडले होते. काही दिवसांपासून सोनू रात्री बेरात्री घरी यायचा आणि दीपीकाला सोबत न्यायचा.खाणेपिणे करून ते नंतर पहाटे परतायचे. बुधवारी तसेच झाले. रात्री सोनू तिला आपल्या दुचाकीवर घेऊन गेला आणि हे दोघे पहाटे परतले. त्यानंतर दोघेही सोनूच्या रूममध्ये गेले. पहाटे परतल्यानंतर ते दिवसभर झोपतात, हे माहित असल्यामुळे आईनेही लक्ष दिले नाही. गुरुवारी रात्रीचे ८ ते ८.३० वाजूनही दिपीका तिच्या रूममधून बाहेर आली नसल्याने तिच्या आईने आवाज दिले. रुममध्ये टीव्ही सुरू होता. आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून आईने घरमालकाला सांगितले. त्यानंतर घरमालक वानखेडे यांनी बाजुच्या खिडकीचे तावदान सरकवून बघितले असता दोघेही ओढणीने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शेजा-यांनी लकडगंज ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर ठाणेदार सत्यवान माने आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. या दोघांचे मृतदेह खाली उतरवण्यात आले. ते रुग्णालयात पाठविल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली.
आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
पोलिसांनी खोलीची तपासणी केली असता या दोघांचे पती-पत्नीसारखे अनेक फोटो आढळले. मात्र, सुसाईड नोट किंवा अन्य दुसरे कागदपत्र आढळले नाही. त्यामुळे त्यांनी आत्महत्या का केली ते स्पष्ट झाले नव्हते. गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पोलीस घटनास्थळी तपास करीत होते.