राणेंसाठी दिल्लीत खलबते
By admin | Published: December 4, 2015 01:16 AM2015-12-04T01:16:48+5:302015-12-04T01:16:48+5:30
विधान परिषदेच्या ८ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीतील जागावाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अजून एकमत झालेले नसताना मुंबईतून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी
- अतुल कुलकर्णी, मुंबई
विधान परिषदेच्या ८ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीतील जागावाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अजून एकमत झालेले नसताना मुंबईतून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्याविषयी दिल्लीत खलबते सुरू आहेत.
राणे यांनीदेखील आपल्याला उमेदवारी दिली तर विचारपूर्वक
निर्णय घेऊ, असे सांगितले; शिवाय मनसेची मते मिळविण्याची ताकद फक्त राणेंकडेच आहे हेही एक कारण त्यामागे असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई महापालिकेचे संख्याबळ आणि याआधीच्या निवडणुकीत मतांची झालेली फाटाफूट पाहता विद्यमान आमदार भाई जगताप यांना पुन्हा संधी देणे पक्षातील काही नेत्यांना जोखमीचे वाटत आहे. तर राणे पुन्हा सक्रिय राजकारणात आले तर आपले काय, अशी भीतीही
काहींच्या मनात आहे. सध्या मुंबई महापालिकेत काँग्रेस ५१, राष्ट्रवादी १४, समाजवादी पक्ष ९ असे काँग्रेसच्या बाजूने ७४ एवढे संख्याबळ आहे. तर शिवसेना ७४, भाजपा
३१ अशी १०५ बेरीज भाजपा-सेनेच्या बाजूने आहे. निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या ७६ मतांची गरज आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम हे पहिल्या पसंतीत निघू शकतील, असा सत्ताधाऱ्यांचा होरा आहे. या सगळ्यात मनसेची २८ मते निर्णायक ठरू शकतात. जर राणे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली तर शिवसेना आणखी एक उमेदवार देईल आणि कोणत्याही परिस्थितीत राणे येणार नाहीत याची व्यवस्था करेल, असे सेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्यांनी सांगितले. काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांना पालिकेत उमेदवारी देण्याचे आश्वासन देत त्यांची मते फोडण्याचे राजकारणही शिवसेना खेळेल, असे सांगितले जात आहे.
भाई जगताप आपल्यालाच उमेदवारी मिळेल याविषयी आश्वस्त असले तरी मागील निवडणुकीच्या वेळी काँग्रेसची ६ ते ७ मते फुटल्याचा संशय व्यक्त केला गेला
होता. त्याआधीच्या निवडणुकीतही काँग्रेसचे बहुमत असताना कमरुद्दीन मर्चंट यांना याच फुटीचा जोरदार फटका बसला होता. याहीवेळी
जर काँग्रेसच्या मतांमध्ये फाटाफूट झाली तर मनसेची मते कामी येतील आणि काँग्रेस आपली जागा राखू शकेल, असा अंदाज बांधला जात आहे. राणेंचा विजय काँगे्रससाठी फायद्याचा असला तरी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राणेंचा विजय शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरू शकतो.