राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना? देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांना चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 12:36 PM2021-10-29T12:36:06+5:302021-10-29T12:36:31+5:30
'नवाब मलिकांना सध्या काही काम नाही, त्यांच्या प्रत्येक विधानावर लक्ष देण्याची गरज नाही.'
नागपूर: गोवा ड्रग्स क्रुझ पार्टी प्रकरण सुरू झाल्यापासून एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे(Sameer Wankhede) आणि राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. आजही मलिकांनी समीर वानखेडे भाजपचे पोपट असून, भाजपचा जीव त्या पोपटात अडकलाय, असा टोला लगावला होता. मलिकांच्या या टोल्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Dvendra Fadnavis) प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी, राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना? असा चिमटा काढला. तसेच, कोण कोणाचा पोपट आहे, हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल, आमच्यासाठी नाही, असं फडणवीस म्हणाले. याशिवाय, नवाब मलिक दिवसभर काही ना काही बोलत असतात. सध्या त्यांना दुसरं काहीच काम नाही. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक विधानावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, असं म्हणत या प्रकरणावर जास्त बोलणं टाळलं.
काय म्हणाले होते नवाब मलिक?
नवाब मलिक यांनी आज समीर वानखेडे यांच्यासह भाजपवरही टीका केलीये. 7 डिसेंबर रोजी अधिवेशन होणार आहे. त्यावेळी माझ्यावर हल्ले केले जातील, माझ्या जावयाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण आता मी काही बोलणार नाही, मला विषयांतर करायचे नाही. हिवाळी अधिवेशनात अनेक मोठी नावे उघड होणार, असं नवाब मलिक म्हणाले होते.
भाजपा नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही
भाजपचे नेते आणि त्यांचे राईट हँड हे कालपासून समीर वानखेडे यांची भेट घेत आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनामघ्ये मी त्या नेत्यांची नावं जाहीर करणार आहे. त्यानंतर या लोकांना महाराष्ट्रात तोंड दाखवणं मुश्किल होणार आहे. महिन्याभरापूर्वी परिस्थिती निराळी होती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. कालपासून भाजपचे नेते आणि त्यांचे राईट हँड हे वानखेडेंची भेट घेत आहेत. काशिफ खान याला अटक केल्यानंतर अनेकांची पोलखोल होईल. त्याच्याकडे किती लोकांचे पैसे आहेत हे उघड होईल. विधानसभेचं हिवाळी अधिवेशन वादळी होईल, असंही मलिक म्हणाले.