पालिकेच्या विद्यार्थ्यांना मोफत बेस्ट बसपास?
By admin | Published: July 10, 2015 03:50 AM2015-07-10T03:50:23+5:302015-07-10T03:50:23+5:30
विद्यार्थ्यांच्या बसपासमध्ये केलेली दुप्पट दरवाढ कमी करण्यास बेस्ट प्रशासनाने अनुकूलता दर्शविली आहे़ परंतु पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंप्रमाणे पासही
मुंबई : विद्यार्थ्यांच्या बसपासमध्ये केलेली दुप्पट दरवाढ कमी करण्यास बेस्ट प्रशासनाने अनुकूलता दर्शविली आहे़ परंतु पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंप्रमाणे पासही मोफत देण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत केली़ याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात येणार आहे़
१ जानेवारी २०१५पासून सुधारित दरानुसार पालिकेच्या विद्यार्थ्यांना दर १० कि़मी़साठी सहामाही बसपासचे दर ९०० वरून १८०० रुपये करण्यात आले आहेत़ यात बदल करून पुन्हा जुन्याच दरानुसार बसपास आकारावा़ तसेच १० कि़मी़पेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी २५०० रुपयांवरून १४०० रुपये करण्याची उपसूचना काँग्रेसचे रवी राजा यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत आज केली़
खासगी शाळांसाठी बसपासचे दर १० कि़मी़चे २४०० वरून २ हजार तर १० कि़मी़पेक्षा ३५०० वरून २५०० रुपये करण्याची मागणी सदस्यांनी केली़ तसेच पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना बसपास मोफत द्यावा, असा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत ठेवणार असल्याचे बेस्ट समितीचे अध्यक्ष अरविंद दूधवडकर यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)