बीपीटीत ३०० कोटींचे क्रुझ टर्मिनल : नितीन गडकरींची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 05:13 AM2017-08-09T05:13:13+5:302017-08-09T05:13:24+5:30
मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ३०० कोटी रुपये खर्चून क्रुझ टर्मिनल उभारण्याच्या कामाची सुरुवात येत्या १५ दिवसांत करण्यात येईल. येत्या दोन वर्षांत हे काम पूर्ण होणार असून नंतर त्याचा विस्तारही केला जाईल. मुंबईच्या समुद्रात जलवाहतूक सुरू करण्यासाठी केंद्र सरकार ५० टक्के आर्थिक भार उचलेल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी केली.
केंद्र सरकारचे पर्यटन मंत्रालय, केंद्रीय जहाज मंत्रालय, महाराष्ट्र शासन, सागरमाला, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतात क्रुझ पर्यटनाचा उदय’ या विषयावर आयोजित परिषदेत आणि नंतर आयोजित पत्र परिषदेत गडकरी बोलत होते. क्रुझ पर्यटनाद्वारे सध्या देशाला केवळ ७१२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. येत्या पाच वर्षांत ते ३५ हजार कोटी रुपयांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. सध्याची २ लाख प्रवासी संख्या पाच वर्षांनी ४० लाखांवर गेलेली असेल आणि सव्वालाख लोकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असे गडकरी म्हणाले.
ठाणे येथे सागरी वाहतूक करण्याचा प्रस्ताव तेथील महापालिकेने तयार केला आहे. तेथील महापौर, आयुक्त आणि खासदारांशी आपली चर्चा झाली आहे. २ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पात केंद्र सरकार एक हजार कोटी रुपयांचा वाटा उचलेल. मुंबईत अशी वाहतूक सुरू करण्यासाठीही ५० टक्के योगदान देईल. मुंबईत सागरी वाहतूक सुरू व्हावी, ही आपली वैयक्तिक इच्छा असल्याचे गडकरी म्हणाले.
या वेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खा. अरविंद सांवत, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया, मुंबई फर्स्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी, युके कार्निव्हलचे अध्यक्ष डेव्हिड डिंगल, केंद्र सरकारच्या जहाज मंत्रालयाचे सचिव रविकांत, केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या सचिव रश्मी वर्मा आदी उपस्थित होते.
मेरीटाइम युनिर्व्हसिटीचे रत्नागिरीत उपकेंद्र
चेन्नई येथील मेरीटाईम युनिर्व्हसिटीचे उपकेंद्र रत्नागिरी येथे सुरू करण्यात येईल आणि तेथे सागरी पर्यटनाशी संबंधित विविध अभ्यासक्रम चालविले जातील. त्यासाठी रत्नागिरी आपल्या विभागाने २० एकर जमीन खरेदी केली असल्याचे गडकरी यांनी पत्रकारांना सांगितले.
देशातील क्रुझ पर्यटनासाठी गृहबंदर (होमपोर्ट) म्हणून आमची निवड झाली याचा आनंद आहे. क्रुझ केंद्र म्हणून राज्याला विकसित करण्यासह धोरणे आखण्यासाठी नौवहन मंत्रालयाशी परस्पर सहकार्य करण्यात येणार आहे. स्थानिक आणि परदेशी पर्यटकांसाठी क्रुझ पर्यटनात मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. क्रुझ पर्यटन हे ‘गेम चेंजर’ असल्याने मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळणार आहे. - जयकुमार रावल, पर्यटनमंत्री
क्रुझ पर्यटनासाठी मुंबईची निवड होणे गौरवास्पद आहे. राज्य आणि केंद्रासह उर्वरित संस्थांशी समन्वय साधत यासाठी अधिक प्रयत्न केले जातील. विशेषत: मुंबई पोर्ट ट्रस्ट याकामी अग्रभागी आहे. क्रुझ पर्यटनाद्वारे प्रवाशांना उत्तम सेवा सुविधा दिल्या जातील. - संजय भाटिया, अध्यक्ष, मुंबई पोर्ट ट्रस्ट