विमानांच्या अत्यंत जलद सेवेला बसतो आहे ‘ब्रेक’
By admin | Published: May 20, 2014 03:44 AM2014-05-20T03:44:11+5:302014-05-20T03:44:11+5:30
बस, रेल्वेपेक्षा अत्यंत जलद देणारी सेवा म्हणजेच विमानसेवा मानली जाते. मात्र या जलद सेवेला सध्या ‘ब्रेक’ लागत असल्याचे समोर आले आहे.
मुंबई : बस, रेल्वेपेक्षा अत्यंत जलद देणारी सेवा म्हणजेच विमानसेवा मानली जाते. मात्र या जलद सेवेला सध्या ‘ब्रेक’ लागत असल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन महिन्यांत मुंबई विमानतळावरील ८२३ विमान उड्डाणे उशिराने धावल्याचे नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून सांगण्यात आले आहे. मात्र फेब्रुवारी ते एप्रिल अशा प्रत्येक महिन्याची तुलना केली असता उड्डाणे उशिराने धावण्याचे प्रमाण हे कमीच असल्याचे मुंबई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील अधिकार्यांकडून सांगण्यात आले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी दोन विमानतळे असून, यात टी-२ नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात आले आहे. या नवीन विमानतळामुळे विमानांचा प्रवास सुकर झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र काही तांत्रिक आणि इतर विविध कारणांमुळे मुंबई विमानतळावरील विमानांची उड्डाणे लांबणीवर पडत असून, ती उशिरानेच धावत आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात ३५३, त्यानंतर मार्च महिन्यात २५२ आणि एप्रिल महिन्यात २१८ उड्डाणे उशिराने धावली आहेत. एप्रिलमध्ये उशिराने धावलेल्या उड्डाणांमध्ये तर ६३ उड्डाणे जेट एअरवेजची, ५८ उड्डाणे एअर इंडियाची असून, ९७ उड्डाणे इतर विमान कंपन्यांची आहेत. हे प्रमाण पाहता ते कमीच होत असल्याचे हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील एका अधिकार्याने सांगितले. उड्डाणे उशिराने धावण्याचे प्रमाण जवळपास १३ टक्के कमी झाले आहे. याविषयी अधिकार्याने सांगितले की, जास्तीतजास्त तांत्रिक चुकांमुळेच उड्डाणे रद्द होण्याचे प्रमाण आहे. मात्र टी-२मुळे विमानांचा मार्ग सुकर झाला हे मात्र नक्की. (प्रतिनिधी)