कारगिलच्या युद्ध क्षेत्रात सोलापूरच्या जवानांचे शौर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:48 PM2019-07-26T12:48:40+5:302019-07-26T12:51:00+5:30
कारगील विजय दिन;देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजतागायत झालेल्या विविध युद्धात सोलापूर जिल्ह्यातील ५८ सैनिक शहीद झाले.
सोलापूर : पाकिस्तानने कारगिलच्या टेकड्यांवर कब्जा केल्याचे समजल्यानंतर भारतीय लष्कर सतर्क झाले अन् दोन देशांदरम्यान अघोषित युद्ध सुरू झाले. साºया जगाचे लक्ष या युद्धाकडे लागून होते. भारतीय जवान पाकिस्तानी लष्कराला कसे प्रत्त्युतर देतात हेही, पाहिले जात होते. पण भारतीय सैन्याने आपले शौर्य दाखवून पाकिस्तानला पराभवाची धूळ चाखली अन् ‘विजय दिवस’ साजरा केला.
या युद्धात सोलापूर जिल्ह्यातील जवानांनी शौर्याची पराकाष्टा करुन पाक सैन्याशी लढा दिला. शिपाई सुरेश देशमुख, सोनंद (ता. सांगोला) हे आॅपरेशन विजयमध्ये पाक लष्कराशी लढताना शहीद झाले तर कारगिल युद्धादरम्यान काळातच झालेल्या आॅपरेशन डेव्हिड, आॅपरेशन मेघदूतमध्ये अनुक्रमे शिपाई कमल काझी, सापटणे (ता. माढा), नायक सुबेदार किसन माने, येर्डाव (ता. मंगळवेढा) यांनी हौतात्मे पत्करले. याच काळामध्ये काश्मिर सीमेवर आतरिकीशी लढताना जुना देगाव नाका येथे सुनील कोळी, मणिपूर जवळील जरीबाम येथे नक्षलवाद्याशी दोन हात करताना शिरपनहळ्ळीचे (ता. दक्षिण सोलापूर) नामदेव काशीद शहीद झाले.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजतागायत झालेल्या विविध युद्धात सोलापूर जिल्ह्यातील ५८ सैनिक शहीद झाले आहेत. यापैकी ४४ शहीद जवानांचे वारस आहेत. यामध्ये ३६ वीरपत्नी व ८ माता-पित्यांचा समावेश आहे. कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना मानवंदना देण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता बहुउद्देशीय सभागृहात शहीद जवानांच्या वीरपत्नी व वीर माता-पित्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी १४ वीर पत्नी आणि माजी सैनिकांना स्वयंरोजगार व घरबांधणीसाठी ९ लाख ५६ हजारांचे आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात येणार आहेत. तसेच वीरपत्नी व माता-पिता आणि माजी सैनिक अशा सात जणांना एसटीचे मोफत प्रवास सवलतीचे पास देण्यात येतील.
देश स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे १९४७ नंतर आत्तापर्यंत विविध ठिकाणी युद्ध झाले आहेत. १९६२ मध्ये चीन, १९६५ मध्ये पाकिस्तान, १९७१ मध्ये पाकिस्तान, १९८७ ते ८९ दरम्यान श्रीलंकेत आॅपरेशन पवन आणि यानंतर १९९९ मध्ये कारगिल युद्ध झाले. कारगिल युद्ध हे आजपर्यंत झालेल्या युद्धातील, जगात सर्वात उंचीवर लढलेले युद्ध म्हणून नोंदले गेले आहे. या युद्धात ५२७ जवान शहीद झाले तर १३६३ जवान जखमी झाले होते. २६ जुलै रोजी कारगिल युद्धात विजय मिळाला. त्यामुळे हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून पाळला जातो.