ब्राव्हो, टीम नागपूर !
By admin | Published: January 29, 2015 01:03 AM2015-01-29T01:03:44+5:302015-01-29T01:03:44+5:30
‘मेट्रो सिटी’ होण्याकडे वाटचाल करीत असलेल्या नागपूरच्या कला व सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती होत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली
नागपूरकर विद्यार्थ्यांची ‘व्हाईट हाऊस’कडून दखल : लेझिम पथकाचा फोटो संकेतस्थळावर
नागपूर : ‘मेट्रो सिटी’ होण्याकडे वाटचाल करीत असलेल्या नागपूरच्या कला व सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती होत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या गणतंत्रदिनाच्या परेडमध्ये नागपुरातील १६० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लेझिमचे सादरीकरण केले होते. लेझिम पथकाने ओबामा यांना इतके प्रभावित केले की ‘व्हाईट हाऊस’च्या संकेतस्थळावर त्यांच्या निर्देशांनुसार या परेडचा हा फोटो ‘अपलोड’ करण्यात आला आहे. विशेष म्हणजे २६ जानेवारी रोजीचा ‘फोटो आॅफ द डे’ असा याचा उल्लेख करण्यात आला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या उपस्थितीमुळे नवी दिल्लीतील राजपथ येथे पार पडलेल्या यंदाच्या गणतंत्रदिवसाच्या परेडमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून आला. प्रजासत्ताक दिनी राजपथावर प्रस्तुत करण्यात आलेल्या निरनिराळ्या चित्ररथांसोबत पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. यातील लेझिम पथकात नागपुरातून २० शाळांच्या १६० विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता. दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या उपक्रमातून नागपूर लेझिम टीम दिल्लीत पोहचली होती. या लेझिम पथकाची दखल केवळ दिल्लीकरांनीच नव्हे, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीदेखील घेतली. त्यांना या लेझिम पथकाच्या सादरीकरणाने प्रभावित केले. ‘व्हाईट हाउस’च्या अधिकृत संकेतस्थळावर या लेझिम पथकाचे फोटो प्रसिध्द करण्यात आले आहे. यासोबतच चित्ररथांमध्येदेखील महाराष्ट्राच्याच चित्ररथाचा फोटो दिसून येत आहे. (प्रतिनिधी)