मंगळागौरीत रंगले ब्राझिलियन विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2016 03:02 AM2016-08-25T03:02:06+5:302016-08-25T03:02:06+5:30
महिलांचा सामूहिक पारंपरिक सण नव्या पिढीपुढे सादर करून आपली प्राचीन परंपरा अबाधित राखण्याचा उपक्रम हाती घेतला.
अलिबाग : येथील महिलांनी एकत्र येवून मनस्विनी नामक महिला गटाची स्थापना करून त्यांच्या माध्यमातून महिलांचा सामूहिक पारंपरिक सण नव्या पिढीपुढे सादर करून आपली प्राचीन परंपरा अबाधित राखण्याचा उपक्रम हाती घेतला. त्या अंतर्गत महिलावर्गाचा अत्यंत आवडीचा आणि आनंददायी अशा मंगळागौर सणाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईत अभ्यासाकरिता आलेल्या ब्राझिलियन विद्यार्थ्यांनी देखील आनंद घेऊन ते सुखावल्याची माहिती मनस्विनी महिला गटाच्या सदस्या अनिता जोशी यांनी दिली आहे.
या कार्यक्रमात ब्राझीलच्या विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावून विविध खेळांमध्येही ते सहभागी झाले होते. ब्राझिलियन विद्यार्थ्यांनी झिम्मा या खेळात फुगडी घालण्याची अनुभूती घेतली. मि. गब्रियेल याच्या नेतृत्वाखाली हे ब्राझिलियन विद्यार्थी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करीत आहेत. पारंपरिक मंगळागौरीचा सण या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ब्राझीलपर्यंत पोहोचणार असल्याने सहभागी महिला देखील सुखावून गेल्या होत्या. वेदिता बुरसे हिने मंगळागौरीच्या जवळजवळ ५५ खेळांची तयारी करून घेतली होती. अॅड.स्वाती लेलेंचे निवेदन, शिल्पा कोसमकर यांचे गायन आणि अॅड.नीला तुळपुळे, माधुरी जोशी यांची साथ, धनश्री बुरसे यांचे तबलावादन यामुळे या कार्यक्र माला चांगलाच साज चढला होता. सुरुवातीला गणपती फुगडी अनिता जोशी, ज्योती मयेकर आणि वर्धन यांनी सादर करून कार्यक्र माची सुरुवात केली. नंतर साधी फुगडी, दंड फुगडी, एका हाताची, तिघींची फुगडी असे फुगडीचे विविध प्रकार खेळले गेले. आगोटा पागोटा, होडी, करवंट्या, बैलजोडी, टांगा, अगं अगं सुनबाई अशा विविध खेळांनी हा मंगळागौरीचा कार्यक्र म उत्तरोत्तर रंगत गेला. पारंपरिक मंगळागौरीबरोबरच उखाणे, स्त्री शिक्षण, लेक वाचवा अभियानविषयक संदेश देत स्त्रीशक्तीचा जागर या खेळाने कार्यक्रमाची सांगता झाली. साधना कोळगावकर, जितेश्री चौगुले, अनिता तुळपुळे, वीणा शेवडे, स्वाती कुलकर्णी, स्वाती पित्रे, सुचिता दामले, छाया शिंदे, अर्चना तिडके, स्मिता गोडबोले या महिलांसह साना तुळपुळे, तलिशा चौगुले या बालिका देखील सहभागी झाल्या होत्या.
>श्रावणगौर गट
मनस्विनी ग्रुपने ‘श्रावणगौर’ नावाच्या मंगळागौरीच्या खेळासाठी एक गट केला. अलिबाग शहरातील मंगळागौरीचा असा हा पहिलाच गट आहे. या गटामध्ये ४ वर्षांपासून ते ५५ वर्षे वयोगटातील हौशी महिला आणि एक छोटा गट पण सहभागी झाला होता. वेदिता बुरसे हिने मंगळागौरीच्या जवळजवळ ५५ खेळांची तयारी करून घेतली होती. अॅड.स्वाती लेलेंचे निवेदन, शिल्पा कोसमकर यांनी गायन के ले.