ताशी १३0च्या वेगाला ‘ब्रेक’
By admin | Published: December 29, 2016 02:05 AM2016-12-29T02:05:16+5:302016-12-29T02:05:16+5:30
मुंबई उपनगरीय लोकलचा प्रवास भविष्यात आणखी वेगवान व्हावा, यासाठी ताशी १३0च्या वेगाने लोकल चालविण्याचे ‘स्वप्न’ एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन)
मुंबई : मुंबई उपनगरीय लोकलचा प्रवास भविष्यात आणखी वेगवान व्हावा, यासाठी ताशी १३0च्या वेगाने लोकल चालविण्याचे ‘स्वप्न’ एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) बाळगले होते. यासाठी सहा लोकल एमआरव्हीसीकडून मुंबईत दाखल केल्या जाणार होत्या, परंतु आरडीएसओच्या चाचणीत ‘नापास’ झाल्याने वेगवान लोकल दाखल करण्यासाठी सिमेन्स कंपनीशी असणारे कंत्राट एमआरव्हीसीने रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ताशी १३0च्या वेगाला ब्रेकच लागला आहे.
एमआरव्हीसीकडून एमयूटीपी-१ अंतर्गत सिमेन्स कंपनीच्या लोकल गेल्या १० वर्षांत टप्प्याटप्प्यांत दाखल झाल्या. पश्चिमबरोबरच मध्य रेल्वेवरही लोकल दाखल झाल्यानंतर, त्या प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या. त्याच वेळी एमयूटीपी-१ अंतर्गत ताशी १३0 किमी वेगाने धावणाऱ्या लोकल मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर चालविण्याचा निर्णयही एमआरव्हीसीने घेतला. मात्र, एमयूटीपी-१मध्ये असलेले अन्य मोठे प्रकल्प पाहता, ताशी १३0 वेगाच्या लोकलचा प्रकल्प एमयूटीपी-२मध्ये समाविष्ट करण्यात आला.
या लोकलसाठी सिमेन्स कंपनीशी १0८ बोगींचा (चाकांचा आकार)
करार करण्यात आला. त्याची एकूण किंमत ही ६0 कोटी रुपये ठरवण्यात आली.
प्रत्येक डब्यासाठी दोन बोगी, याप्रमाणे ५४ डब्यांसाठी या बोगी बसविण्याचे ठरवले. म्हणजेच नऊ डब्यांच्या सहा नव्या लोकल दाखल करण्याचे उद्दिष्ट एमआरव्हीसीने ठेवल, परंतु या लोकल दाखल करण्यापूर्वी त्यांना तांत्रिक चाचणी पास करणे आवश्यक होते.
रेल्वेच्या आरडीएसओकडून (रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड आॅर्गनायझेशन) करण्यात येणाऱ्या खडतर चाचणीतून पास झाल्यानंतरच, ताशी १३0 किमी वेगाचे स्वप्न पूर्ण होणार होते. मात्र, आरडीएसओकडून एका बोगीच्या घेण्यात आलेल्या चाचणीत सिमेन्स नापास झाली. त्यामुळे एमआरव्हीसीने सर्व
१0८ बोगींचे असणारे कंत्राटच रद्द करण्याचा निर्णय घेतला. या बोगी डब्यांना जोडून नव्या लोकल चेन्नईतील रेल्वेच्या आयसीएफमध्ये बनविल्या जाणार होत्या. (प्रतिनिधी)
चाचणीत लोकल नापास
या संदर्भात एमआरव्हीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांना विचारले असता, करार रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. १0८ बोगींचे हे कंत्राट होते, परंतु आरडीएसओच्या चाचणीत नापास झाल्याने कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- बम्बार्डियर कंपनीच्या ७२ लोकल पश्चिम रेल्वेमार्गावर टप्प्याटप्प्यांत दाखल होत आहेत. या लोकलचा जास्तीत जास्त वेग ताशी ११0पर्यंत जाऊ शकतो.
सध्या पश्चिम व मध्य रेल्वेवर धावणाऱ्या सिमेन्स कंपनीच्या लोकल या ताशी १00पर्यंत वेगाने धावू शकतात.
भविष्यात मुंबईतील रेल्वे ट्रॅकचा वेग आणखी वाढल्यास या लोकलही तेवढ्याच वेगाने धावतील, याप्रमाणे त्याचे नियोजन करण्यात आले होते. ताशी १३0च्या वेगाने धावणाऱ्या लोकल आणून त्या जलद मार्गावर चालविण्याचे स्वप्न होते.
पश्चिम व मध्य रेल्वेवर बारा डबा लोकल धावत आहेत. त्यामुळे नऊ डबा लोकल आणून नक्की कोणता फायदा साध्य होणार होता, असा सवालही उपस्थित होत आहे.