रिपाइं ऐक्याआधी भाजपाशी युती तोडा!
By admin | Published: May 3, 2017 04:08 AM2017-05-03T04:08:00+5:302017-05-03T04:08:00+5:30
रिपब्लिकन ऐक्यासाठी बैठक घेणाऱ्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आधी भारतीय जनता पार्टीसोबतची
मुंबई : रिपब्लिकन ऐक्यासाठी बैठक घेणाऱ्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आधी भारतीय जनता पार्टीसोबतची युती तोडावी, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या खरात गटाने केले आहे. भाजपा आणि रिपब्लिकन पक्षाच्या विचारांत फरक असून, रिपब्लिकन ऐक्याची घोषणा करणाऱ्यांनी आधी धर्मांध पक्षाची साथ सोडावी, असेही रिपाइंचे अध्यक्ष सचिन खरात यांनी सांगितले आहे.
खरात म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाची आघाडी किंवा ऐक्य करण्याचे आवाहन आठवले यांनी केले आहे. समाजातील सर्व घटकांना एकसंघ करून रिपब्लिकन पक्ष तयार करण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र रिपब्लिकन पक्षाची निर्मिती शोषितांना न्याय मिळवून देणे व धर्मांध, जातीयवादी, प्रांतवादी व मनुवादी पक्षांना विरोध करण्यासाठी झालेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना तिलांजली देऊन काहीही करून सत्ता हस्तगत करणे, हे रिपब्लिकन पक्षाचे ध्येय नाही, असे म्हणत खरात यांनी आठवलेंना चिमटा काढला आहे.
भाजपा हा जहाल हिंदुत्ववादी पक्ष आहे. रिपब्लिकन पक्षाच्या व भाजपाच्या विचारात फरक आहे. म्हणून रिपब्लिकन पक्षाची आघाडी, विलीनीकरण अथवा ऐक्य करावयाच्या आधी आठवले यांनी भाजपाशी सर्व प्रकारचे संबंध संपुष्टात आणावेत, असे आवाहन खरात यांनी मंगळवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. ऐक्य विचारांचे व्हावे, सत्ता हे आपले अंतिम ध्येय नाही, असेही खरात यांनी सांगितले. बौद्धमय भारत निर्माण करणे हे आपले उद्दिष्ट असून, आंबेडकरवादी व मनुवादी एका नावेत बसू शकत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)