ब्रेक बिल्डर्स चॅम्पियन
By admin | Published: July 4, 2016 04:10 AM2016-07-04T04:10:50+5:302016-07-04T04:10:50+5:30
शानदार खेळाच्या जोरावर द ब्रेक बिल्डर्स संघाने रॉयल स्ट्रायकर्स संघाचा ३-० असा धुव्वा उडवला.
मुंबई : शानदार खेळाच्या जोरावर द ब्रेक बिल्डर्स संघाने रॉयल स्ट्रायकर्स संघाचा ३-० असा धुव्वा उडवला. या विजयासह ब्रेक बिल्डर्स संघाने पहिल्या स्नुकर प्रीमीयर लिगमध्ये चॅम्पियन किताबावर नाव कोरले. महाराष्ट्र स्नुकर अॅन्ड बिलीयर्डस संघटनेने स्नुकर लिगचे आयोजन केले होते. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी चॅम्पियन ब्रेक बिल्डर्स संघाचे अभिनंदन केले.
चर्चगेट येथील गरवारे हाऊसमध्ये स्पर्धेच्या अंतिम सामन्यात द ब्रेक बिल्डर्स आणि रॉयल स्ट्रायकर्स आमने-सामने आले. बिल्डर्सच्या माजी राष्ट्रीय विजेता मनन चंद्राने सौरव कोठारीचा १५ रेड प्रकारात दोन फ्रेममध्ये ६६-२३, ६६-२१ असा पराभव करत १-० अशी आघाडी घेतली. तर ६ रेड प्रकारात झालेल्या सामन्यात शाहबाज अदिल खानने स्ट्रायकर्सच्यासअलोक कुमारला ३९-२०, ६९-० असे नमवत आघाडी २-० ने भक्कम केली.
डबल्समध्ये रिषभ ठक्करने स्पर्श फेरवानीसह खेळण्यास सुरुवात केली. या जोडीने स्ट्रायकर्सच्या सुनील जैन-हसन बदामी जोडीला ७६-३४ अशी मात देत ३-० अशा
फरकाची नोंद करत ब्रेक बिल्डर्सने चॅम्पियन किताबाला गवसणी घातली.
दरम्यान, उपांत्य फेरीत रॉयल स्ट्रायकर्स संघाने सतरंगी स्क्वॉडला ३-० असे नमवले होते. तर ब्रेक बिल्डर्स संघाने युनायका चॅलेंजरचे तगडे आव्हान ३-२ असे संपुष्टात आणले होते. (क्रीडा प्रतिनिधी)