सोन्याची अंगठी मोडून शाळेची दुरुस्ती, शिक्षकाचा होणार सन्मान; साहित्य संमेलनात दोन अंगठ्या देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 03:21 AM2017-12-23T03:21:49+5:302017-12-23T13:44:30+5:30
शाळेच्या दुरुस्तीसह ई-लर्निंग शाळा बनविण्यासाठी शिक्षकाने स्वत:च्या ‘जीपीएफ’मधून कर्ज काढले. ते कमी पडले म्हणून सोन्याची अंगठी मोडली. या शिक्षकाचा अंबाजोगाई येथे होणा-या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात विद्यार्थीस्नेही शिक्षक रवींद्र गायकवाड यांचा सपत्नीक नवीन कपडे, सोन्याच्या दोन अंगठ्या देऊन विशेष सत्कार ठेवला आहे.
- राम शिनगारे
औरंगाबाद : शाळेच्या दुरुस्तीसह ई-लर्निंग शाळा बनविण्यासाठी शिक्षकाने स्वत:च्या ‘जीपीएफ’मधून कर्ज काढले. ते कमी पडले म्हणून सोन्याची अंगठी मोडली. यातून शाळा अत्याधुनिक बनवली. याची माहिती बीड जि. प.च्या शिक्षण सभापतींना होताच त्यांनी अंबाजोगाई येथे होणा-या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात विद्यार्थीस्नेही शिक्षक रवींद्र गायकवाड यांचा सपत्नीक नवीन कपडे, सोन्याच्या दोन अंगठ्या देऊन विशेष सत्कार ठेवला आहे.
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील देटेवाडी हे अतिशय दुर्गम भागातील गाव. गावात केवळ २० कुटुंबे राहतात. या गावात पोहोचण्यासाठी रस्ताही नाही. इतर सोयींची तर वाणवाच. या गावात एक वर्गखोली आणि एकशिक्षकी शाळा आहे. या शाळेत बार्शी तालुक्यातील पाथ्री गावाचे रवींद्र गायकवाड हे शिक्षक २३ मार्च २०११ रोजी रुजू झाले. तेव्हा १ ते ४ पर्यंत असणा-या शाळेत केवळ ११ विद्यार्थी होते. रुजू होताच गायकवाड यांनी विविध प्रयोगास सुुरुवात केली. यामुळे दोन वर्षांतच विद्यार्थ्यांची संख्या २० वर पोहोचली.
२०१४-१५ मध्ये सर्वत्र ई-लर्निंगचे वारे होते, तेव्हा आपलीही शाळा दुुरुस्त करून ई-लर्निंग झाली पाहिजे, असा गायकवाड यांचा मानस होता; मात्र पैशांची कमतरता होती, तेव्हा गायकवाड यांनी स्वत:च्या भविष्य निर्वाह निधीतून (जीपीएफ) ३५ हजार रुपये उचलले. गावक-यांनी वर्गणीतून १० हजार रुपये जमा केले. तरीही शाळेच्या भिंतींचे प्लास्टर, रंग, पत्रे यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू लागला. तेव्हा गायकवाड यांनी स्वत:च्या लग्नात सास-याने केलेली ५ ग्रॅम सोन्याची अंगठी मोडली. यातून १४ हजार रुपये मिळाले. ही अंगठी मोडताना पत्नीसोबत वादही झाला. तरीही शाळेचा ध्यास घेतलेल्या गायकवाड यांनी हार मानली नाही. शाळा दुरुस्तीसह ई-लर्निंग बनवली.
यावर्षी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना टॅब देत जिल्ह्यातील पहिली टॅबयुक्त शाळा बनवली. या टॅबच्या वाटपासाठी बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख हे शाळेवर पोहोचले, तेव्हा त्यांना गायकवाड यांच्या कार्याची माहिती कळली. यावर्षीचे मराठवाडा सहित्य संमेलन अंबाजोगाईत होत आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख आहेत. त्यांनी संमेलनात गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्याचा निर्णय ठेवला. यासाठी त्यांनी गायकवाड दाम्पत्याला प्रत्येकी ५ ग्रॅम सोन्याची अंगठी आणि नवीन कपडे केले आहेत. साहित्य संमेलनाच्या सुरुवातीलाच रवींद्र गायकवाड यांचा सत्कार केला जाणार आहे.
दप्तरमुक्त शाळा
२० विद्यार्थ्यांची देटेवाडीची शाळा दप्तरमुक्त आहे. सर्व विद्यार्थ्यांना टॅब मिळालेले आहेत. या टॅबमध्ये विद्यार्थ्यांनी पुस्तके डाऊनलोड केलेली आहेत. शाळेत येताना विद्यार्थी टॅब घेऊन येतात. विद्यार्थी पूर्णपणे टेक्नोसॅव्ही झाल्याचे रवींद्र गायकवाड सांगतात. या टॅबच्या खरेदीसाठी ८४ हजार रुपये खर्च आला. हा खर्च भागवण्यासाठी गावातील तीन जणांनी परत देण्याच्या बोलीवर प्रत्येकी २० हजार रुपये दिले. गायकवाड यांच्यासह दुसºया एका शिक्षकाने २० हजार दिले. यातून ही खरेदी झाली आहे. आता हे पैसे परत करण्याचेही आव्हान आहे.
घरात समस्या; तरीही सामाजिक जाणीव
रवींद्र गायकवाड यांना एक मुलगी व एक मुलगा आहे. यातील मुलगा दिव्यांग असून, त्याला काहीही करता येत नाही. पत्नी-पत्नीला त्याच्यासाठी आळीपाळीने रात्र जागून काढावी लागते. याशिवाय गायकवाड यांच्या मातोश्री ९२ वर्षांच्या आहेत. त्यांनीही मेंदूवरील नियंत्रण गमावले आहे. घरात अशा समस्या असतानाही गायकवाड यांचे शाळेप्रती असणारे प्रेम वाखाणण्याजोगे आहे.
शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे
शिक्षकीपेशा खराब झाला असा प्रसार केला जातो; मात्र आजही रवींद्र गायकवाड यांच्यासारखे विद्यार्थ्यांसाठी समर्पित शिक्षक प्रत्येक शाळेत आहेत. अशा शिक्षकांना शोधून काढून त्यांचा समाजासमोर आदर्श निर्माण केला पाहिजे. आम्ही खूप काही करीत नाही; मात्र अशा शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे उत्तरदायित्व निभावत आहोत.
- राजेसाहेब देशमुख, शिक्षण सभापती, जी. प. बीड
गोरगरीब विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे धडे मिळावे
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे धडे मिळावेत. शहरातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करण्यासाठीचे मनोबल आणि ज्ञान डोंगरकपारीत राहणा-या गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे. यासाठीची ही धडपड आहे. अशीच धडपड प्रत्येक शिक्षकांनी केली पाहिजे.
- रवींद्र गायकवाड, शिक्षक, देटेवाडी शाळा