पॅरॉल तोडणे ही बंदिवासातून सुटका

By admin | Published: April 24, 2016 03:04 AM2016-04-24T03:04:53+5:302016-04-24T03:04:53+5:30

तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने ‘पॅरॉल’ किंवा ‘फर्लो’ रजेची मुदत संपल्यावर पुन्हा तुरुंगात हजर न होणे म्हणजे त्याने कायदेशीर कोठडीतून स्वत:ची सुटका करून घेणेच

Break the parole, get rid of the exile | पॅरॉल तोडणे ही बंदिवासातून सुटका

पॅरॉल तोडणे ही बंदिवासातून सुटका

Next

मुंबई : तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने ‘पॅरॉल’ किंवा ‘फर्लो’ रजेची मुदत संपल्यावर पुन्हा तुरुंगात हजर न होणे म्हणजे त्याने कायदेशीर कोठडीतून स्वत:ची सुटका करून घेणेच ठरते व यासाठी अशा कैद्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम २२४ अन्वये फौजदारी गुन्हा नोंदवून त्यास अटक करणे योग्य आहे, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
जो कोणी आरोप ठेवलेल्या किंवा सिद्ध झालेल्या गुन्ह्यासाठी अटक होण्यास विरोध करेल अथवा त्यात अडथळे आणेल किंवा सिद्ध झालेल्या गुन्ह्यासाठी भोगत असलेल्या शिक्षेतून स्वत:ची बेकायदेशीरपणे सुटका करून घेईल किंवा तसा प्रयत्न करेल, त्यास दोन वर्षांचा कारावास व दंड अशा शिक्षेची तरतूद भादंवि कलम २२४ मध्ये आहे.
‘पॅरॉल’ अथवा ‘फर्लो’ रजेवर तुरुंगातून बाहेर जाणारे कैदी मुदत संपल्यावरही मोठ्या संख्येने परत येत नाहीत, असे निदर्शनास आल्यानंतर उच्च न्यायालयाने मध्यंतरी या संदर्भात कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, तुरुंग प्रशासनाने प्रचलित नियमावलीत बदल करून अशा कैद्यांविरुद्ध कलम २२४ अन्वये गुन्हे नोंदवून त्यांना अटक करण्याचे निर्देश दिले होते.
नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात जन्मठेप भोगत असलेल्या मोहम्मद आझम अस्लम बट्ट या अंबरनाथ येथील कैद्याने अशा प्रकारे कलम २२४ अन्वये गुन्हा नोंदविण्यास आव्हान दिले होते. न्या. रणजित मोरे आणि न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठाने बट्ट याची याचिका फेटाळताना वरीलप्रमाणे निकाल दिला.
मोहम्मद बट्टला ४ सप्टेंबर २०१४ रोजी ३० दिवसांच्या ‘पॅरॉल’वर तुरुंगातून सोडण्यात आले. त्याची ही रजा आणखी प्रत्येकी ३० दिवसांसाठी दोनदा वाढविण्यात आली. बट्टने ४ डिसेंबर २०१४ रोजी पुन्हा तुरुंगात हजर होणे अपेक्षित होते, परंतु तो परत आला नाही, म्हणून त्याला फरार घोषित करून १० जानेवारी २०१५ रोजी अंबरनाथमध्ये त्याच्याविरुद्ध कलम २२४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. कलम २२४ अन्वये गुन्हा नोंदविण्यासाठी कैद्याने कोठडीतून सुटका करून घेण्यासाठी काहीतरी सकारात्मक कृती करण अपेक्षित
आहे. केवळ ठरलेल्या तोरखेला तुरुंगात परत न जाणे, हा फार तर ‘पॅरॉल’च्या अटींचा भंग होऊ शकेल, पण त्यास कैदेतून बेकायदेशीर
सुटका करून घेणे म्हणता येणार नाही, असे बट्ट याच्यावतीने प्रतिपादन केले गेले. (विशेष प्रतिनिधी)

कायद्याचे मुद्दे व त्यांची उत्तरे
या प्रकरणात उपस्थित झालेले कायद्याचे तीन मुद्दे व त्यांची न्यायालयाने दिलेली उत्तरे थोडक्यात अशी:
१) कैद्यास ‘पॅरॉल’ किंवा ‘फर्लो’वर बाहेर सोडणे म्हणजे त्यास कायदेशीर कोठडीतून मोकळे करणे ठरते का?
-‘पॅरॉल’वर असला तरी कैदी शिक्षा भोगतच असतो. ‘पॅरॉल’ रजेचा काळ त्याच्या कैदेतच धरला जातो. त्यामुळे तो तुरुंगाबाहेर असला, तरी कायदेशीर बंदिवासातून मोकळा होत नाही.
२) ‘फर्लो’ किंवा ‘ पॅरॉल’वर सोडलेल्या कैद्यावर तुरुंग अधिकाऱ्यांचे काही नियंत्रण असते का?
-‘पॅरॉल’ किंवा ‘फर्लो’वर सुटलेला कैद्यावर शारीरिकदृष्ट्या नसले, तरी लौकिकार्थाने तुरुंग अधिकाऱ्यांचे नियंत्रण असते.
३) ‘फर्लो’ किंवा ‘पॅरॉल’ची मुदत संपल्यानंतर कैद्याने परत न येणे म्हणजे, त्याने तुरुंगवासातून सुचका करून घेणे ठरते का?
-वरील दोन मुद्द्यांवरून स्पष्ट होणारी स्थिती पाहता, कैद्याने ‘पॅरॉल’ संपल्यावर परत न येणे हे बंदिवासातून सुटका करून घेणेच ठरते.

Web Title: Break the parole, get rid of the exile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.