शहरातील विकासकामांना ब्रेक

By Admin | Published: October 18, 2016 12:48 AM2016-10-18T00:48:28+5:302016-10-18T00:48:28+5:30

राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारी नगर परिषदांच्या निवडणुकांची घोषणा करताना पहिल्यांदाच संपूर्ण जिल्ह्यासाठी आचारसंहिता लागू केली

Break work in the city | शहरातील विकासकामांना ब्रेक

शहरातील विकासकामांना ब्रेक

googlenewsNext


पुणे : राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारी नगर परिषदांच्या निवडणुकांची घोषणा करताना पहिल्यांदाच संपूर्ण जिल्ह्यासाठी आचारसंहिता लागू केली आहे. त्यामुळे अचानकपणे महापालिकेच्या सर्व विकासकामांना मोठा ब्रेक बसला आहे. यापाठोपाठ विधान परिषदेची आचारसंहिता लागू होणार आहे, त्याचबरोबर डिसेंबरनंतर स्वेच्छा निधी खर्च करण्यावर बंधने टाकण्यात आली आहेत, त्यापाठोपाठ पालिका निवडणुकांची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात प्रस्तावित असलेली पालिकेची कोट्यवधी रुपयांची सर्व विकासकामे अडचणीत सापडली आहेत.
नगरपालिकांची घोषणा करताना ज्या जिल्ह्यांमध्ये चारपेक्षा जास्त नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत, तिथे संपूर्ण जिल्ह्यासाठी आचारसंहिता लागू राहील, असे निवडणूक आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये १० नगर परिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. मतमोजणी पूर्ण होईपर्यंत ही आचारसंहिता लागू राहणार आहे. पुणे जिल्ह्यातील नगर परिषदांसाठी १४ डिसेंबरला मतदान होऊन १५ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे.
महापालिका प्रशासनाने आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेतील पदाधिकारी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांच्याकडून रात्रीच शासकीय गाड्या प्रशासनाकडे परत करण्यात आल्या. त्याचबरोबर महापालिकेच्या वतीने आता कोणतेही उद्घाटन, भूमिपूजन, सत्कारसमारंभ आदी कार्यक्रम घेतले जाणार नसल्याचे नगरसचिव कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. आचारसंहितेचा सर्वांत मोठा फटका विकासकामांना बसणार आहे.
>आचारसंहितेच्या अचानक घोषणेने गोंधळ
महापालिकेसाठी आचारसंहिता लागू होणार असल्याची कोणतीही कल्पना नसताना अचानक नगर परिषदा निवडणुकांसाठी महापालिकेलाही आचारसंहिता लागू करण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला. आचारसंहितेच्या घोषणेची अंमलबजावणी लगेच सुरू झाल्याने त्याचे पालन करण्यासाठी पालिकेच्या विविध विभागांमध्ये धावपळ उडाली. मात्र त्याची स्पष्ट नियमावली उपलब्ध न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे फोन करून त्याबाबत विचारणा केली जात होती.
>स्थायी समिती व मुख्यसभेला कोणत्याही विकासकामांना १५ डिसेंबरपर्यंत मंजुरी देता येणार नाही. त्याचबरोबर अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित असलेली तसेच वर्गीकरणाने निधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या कोणत्याही विकासकामांची वर्कआॅर्डर आता काढता येणार नाही. केवळ ज्या कामांची वर्क आॅर्डर निघालेली आहे, तीच कामे यापुढे सुरू राहणार आहेत.
नगर परिषदांच्या निवडणुकांपाठोपाठ विधान परिषदेची आचारसंहिता लागू होणार आहे. नगर परिषदांची आचारसंहिता १५ डिसेंबरपर्यंत आहे, त्यापाठोपाठ आता विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागेपर्यंत ही आचारसंहिता कायम राहील. त्यानंतर काही दिवसांमध्येच महापालिकेची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित असलेल्या विकासकामांना मंजुरी घेऊन त्याची वर्कआॅर्डर घेण्यासाठी केवळ काही दिवसांचाच कालावधी हातामध्ये राहणार आहे.
आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी योग्यरीतीने होते आहे ना याची तपासणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक, सीईओ, आयकर विभाग, बँकेचे अधिकारी यांच्या समितीकडून केली जाणार आहे.
>सोमवारी सायंकाळचे उद्घाटनाचे
४ कार्यक्रम रद्द
निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेची घोषणा झाल्याने महापालिकेच्या वतीने सोमवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेले वडगाव जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन, शिवाजीराजे भोसले कलामंदिर, सिंहगड विकास उद्यान, सुलोचना कुदळे जलतरण तलाव उद्घाटन आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले. आचारसंहिता संपेपर्यंत (१५ डिसेंबर) कोणताही उद्घाटन व भूमिपूजनाचा कार्यक्रम घेता येणार नाही.
>सर्व नगरसेवकांचा उर्वरित वॉर्डस्तरीय निधी लॅप्स
नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी लागू करण्यात आलेली आचारसंहिता १५ डिसेंबरपर्यंत असणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या नवीन आदेशानुसार महापालिका निवडणुकांपूर्वी ३ महिने अगोदरपासूनच खासदार, आमदार व नगरसेवक यांना त्यांचा स्वेच्छा निधी वापरता येणार नाही. त्यामुळे १५ डिसेंबरपासून पुन्हा नवीन आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे सर्व नगरसेवकांचा उर्वरित वॉर्डस्तरीय निधी लॅप्स झाल्यात जमा आहे.

Web Title: Break work in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.