नोटाबंदीमुळे श्रमिक वर्गाचे कंबरडे मोडले!, राजू शेट्टींचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 03:55 AM2017-11-09T03:55:54+5:302017-11-09T03:56:15+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे असंघटित कामगारांसह शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले असून अद्यात या निर्णयाच्या परिणामांमधून श्रमिक वर्ग सावरला नसल्याची टीका

The breakdown of the working class has broken the knot; Raju Shetty suffers | नोटाबंदीमुळे श्रमिक वर्गाचे कंबरडे मोडले!, राजू शेट्टींचा घणाघात

नोटाबंदीमुळे श्रमिक वर्गाचे कंबरडे मोडले!, राजू शेट्टींचा घणाघात

Next

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे असंघटित कामगारांसह शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले असून अद्यात या निर्णयाच्या परिणामांमधून श्रमिक वर्ग सावरला नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. वर्षपूर्तीचे निमित्त साधत विविध सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि कामगार संघटनांनी एकत्रित येत आझाद मैदानात नोटबंदीवरून सरकारविरोधात हल्लाबोल केला. यावेळी शेट्टी बोलत होते.
ते म्हणाले की, अद्याप शेतकरी, शेत मजूर आणि कामगार वर्ग नोटबंदीच्या परिणामांतून सावरलेला नाही. ऐन रब्बीच्या हंगामात जाहीर झालेल्या या निर्णयामुळे शेतकºयांना भाजीपाला रस्त्यावर फेकून द्यावा लागला. शेतमालाचा व्यवहार रोखीने होत असल्याने त्याचा सर्वाधिक त्रास शेतकरीवर्गाने सहन केला. छोट्या संस्था बंद पडल्या असून राज्य बँकाही अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, आगामी निवडणुकांत या नोटबंदीचे उत्तर व्होटबंदीतून श्रमिक देतील.
या निदर्शनांत डावे पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, पत्रकार मोठ्या संख्येने एकवटले होते. त्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, उल्का महाजन, शेतकरी नेते रघुनाथ पाटील, माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, प्रभाकर नारकर, ज्योती बडेकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, जतीन देसाई, फिरोज मिठीबोरवाला यांचा समावेश होता.

नोटबंदीनंतर काळा पैसा सरकारी तिजोरीत आल्याने सामाजिक क्षेत्रांच्या वाट्याला मोठा निधी येऊन विकास होण्याची आशा सरकारने दाखवली होती. मात्र तसे काहीच झाले नाही. उलट सामाजिक क्षेत्रांच्या विकास निधीत यंदा सरकारने कपात केली आहे. अंगणवाडीसारख्या महत्त्वाच्या क्षेत्राच्या अर्थ संकल्पाला सरकारने ६२ टक्क्यांची कात्री लावली. नुकतेच राज्य शासनाने अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांचे धान्य ३५ किलोंवरून ५ किलोपर्यंत घटवले आहे. त्यामुळे सामाजिक क्षेत्रासाठी तरी ही नोटबंदी फसवी ठरली आहे.
- उल्का महाजन, सामाजिक कार्यकर्त्या

फायदा कोणाला झाला!
नोटबंदीनंतर अर्थ व्यवस्थेची वाटचाल उताराला लागली आहे. सर्व पैसा परत आल्याचे बँक प्रशासन सांगते. दहशतवादी हल्ले थांबतील असा दावा केल्यानंतरही सातत्याने हल्ले सुरू आहेत. कष्टकरी आणि मजूरांचा रोजगार कमी झाला आहे. मग नोटबंदीचा फायदा नेमका कोणाला झाला, हे तरी सरकारने स्पष्ट करावे.
- अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या

डिजिटलकडून रोखीकडे वाटचाल!
डिजिटल इंडियाचा दावा करणाºया सरकारच्या भीम अ‍ॅपचा वापर कमी झाला आहे. लोक पुन्हा रोखीच्या व्यवहारांकडे वळले आहेत. नोटबंदीनंतरच्या पहिल्या चार महिन्यांत १५ लाख लोकांच्या नोकºया गेल्या आहेत. नोटबंदीमागे नैतिक कारणे असल्याचे कारण केंद्रीय अर्थ मंत्री देत असले, तरी सर्वसामान्यांना नोटबंदीमागे आर्थिक कारण असल्याचे कळाले आहे. त्यामुळे लोकांमधील असंतोष वाढू लागला असून पुन्हा सरकारकडून हिंदू-मुस्लिम आणि मंदीर-मशिदीचा वाद उकरून काढण्याची शक्यता आहे.
- भालचंद्र मुणगेकर, अर्थ तज्ज्ञ व माजी कुलगुरू-मुंबई विद्यापीठ

Web Title: The breakdown of the working class has broken the knot; Raju Shetty suffers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.