Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 02:45 PM2024-05-14T14:45:22+5:302024-05-14T14:47:15+5:30
Vidhan Parishad Election Update: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीतच जाहीर करण्यात आलेली विधान परिषद निवडणुकीबाबत महत्वाची माहिती आली आहे. शिक्षक, पदवीधरच्या चार मतदारसंघांसाठी जाहीर केलेली निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. या चार जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार होते, तर १३ जूनला मतमोजणी केली जाणार होती.
शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. आयोगाने या संदर्भात विचारविमर्श करून महाराष्ट्र विधान परिषदेच्या उक्त द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नंतरच्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबरचे परिपत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
विधानपरिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे उद्धवसेनेचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे कपिल पाटील व नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांची सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०२४ रोजी संपत आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा महायुती आणि महाविकास आघाडी आमने-सामने येणार आहेत.