नातवांच्या फराळाची गोडी कमी करतोय ‘त्यांच्या’ वास्तवाची कटुता
By admin | Published: October 24, 2014 12:01 AM2014-10-24T00:01:59+5:302014-10-24T00:18:42+5:30
‘लोकमत’ने जिल्ह्यातील अनेक पीडित आजी-आजोबांशी संपर्क साधला असता, हे सत्य उघडकीस आले़- दिवाळीची सामाजिक बांधीलकी
कोल्हापूर, : आयुष्यभर ज्यांनी आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या, आपल्याला उभे करण्यातच त्यांची अर्धी हयात संपली, अशा आई-बापांनाच त्यांच्या वृद्धापकाळात अनेकजणांनी धक्का दिला़ स्वत:च्या घरातच गुलामासारखी वागणूक दिली; पण नातवांना मात्र हे हाल पाहवले नाहीत. प्रत्येक दिवाळीच्या सणाला त्याच्या आईने केलेला फराळ आपल्या लाडक्या आजी-आजोबांना पोहोचविण्याचे काम त्यांनी इमानेइतबारे केले़ गेल्या चार वर्षांत याकामी त्यांनी एकदाही आळस केला नाही़ ही मुले आहेत संबंधितांच्या मुलांची़़. नातवांकडून येणारा हा फराळ त्यांच्या अनुभवाची कटुता कमी करीत आहे़ दिव्यांच्या उत्सवात सगळे जग न्हाऊन निघताना मुलांच्या अनपेक्षित वर्तनाने अंधारात लोटलेल्या आजी-आजोबांना दिवाळीचा फराळ न चुकता पोहोचवून त्यांच्या कोरड्या मनात जिव्हाळ्याचा झरा अखंडित वाहत ठेवण्याचे काम ही नातवंडे करीत आहेत़ दिवाळीनिमित्त ‘लोकमत’ने जिल्ह्यातील अशा अनेक पीडित आजी-आजोबांशी संपर्क साधला असता, हे सत्य उघडकीस आले़ गृृहकलह, आजारपण आणि संपत्तीचा वाद या प्रमुख कारणांमुळे आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठविण्याचे किंवा स्वतंत्र ठेवण्याचे प्रकार अलीकडे वाढत आहेत़ सणासुदीच्या दरम्यान त्यांना येणारा एकटेपणाचा अनुभव बेचैन करणारा असतो़ आपल्या मामाच्या या निर्दयी वर्तनाने कोमल, अजय, प्राजक्ता, युवराज यांसारखी अनेक नातवंडे व्यथित आहेत. आपल्या पीडित आजी-आजोबांना न चुकता दिवाळीचा फराळ घेऊन जातात तेव्हा त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटते अन् ही नातवंडेच त्यांना ‘टू बी आॅर नॉट टू बी धिस इज अ क्वश्चन’ या मानसिकतेतून सावरतात. (प्रतिनिधी)