शिष्टाचार मोडून कुलगुरू पोलीस आयुक्तालयात
By Admin | Published: May 22, 2017 08:19 PM2017-05-22T20:19:33+5:302017-05-22T20:19:33+5:30
राज्यपालांचे थेट प्रतिनिधी तसेच उपराज्यपालांचा दर्जा असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 22 - राज्यपालांचे थेट प्रतिनिधी तसेच उपराज्यपालांचा दर्जा असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सर्व शिष्टाचार (प्रोटोकॉल) बाजूला सारून सोमवारी दुपारी पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची त्यांनी भेट घेतली. साई इन्स्टिट्यूटच्या २७ विद्यार्थ्यांना नगरसेवकाच्या घरी उत्तरपत्रिका सोडविताना पोलिसांनी पकडल्याच्या पार्श्वभूमीवर कुलगुरूंनी ही भेट घेतल्याने खळबळ उडाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सध्या चौका येथील साई इन्स्टिट्यूटच्या अभियांत्रिकी परीक्षा घोटाळ्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. १७ मे रोजी गुन्हेशाखेच्या पोलिसांनी सुरेवाडीचे शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरावर छापा मारून तेथे अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिका लिहित बसलेल्या २७ विद्यार्थ्यांसह, प्राध्यापक, संस्थाचालक, प्राचार्य अशा ३३ जणांना अटक केली होती. या प्रकाराने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. परिणामी देशपातळीवर विद्यापीठाची बदनामी झाली. घटनेच्या काळात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे बाहेरगावी होते. दोन दिवसांपूर्वी ते विद्यापीठात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिगंबर नेटके यांचा तडकाफडकी राजीनामा घेतला. शिवाय या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त केली.
गुन्हेशाखेच्या पोलिसांनी शनिवारी आणि रविवारी प्रा. नेटके यांच्यासह विद्यापीठ परीक्षा विभागाशी संबंधित काही लोकांची चौकशी केली. या पार्श्वभूमीवर कुलगुरू चोपडे यांनी पदाचा प्रोटोकॉल बाजूला सारून पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. पुष्पगुच्छ घेऊन कुलगुरू आणि नेटके यांनी दुपारी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेतली. आयुक्तांशी त्यांनी २० मिनिटे चर्चा केली. यावेळी तेथे उपायुक्त, सहायक आयुक्त आणि तपास अधिकारी उपस्थित होते. पोलीस आयुक्तांना भेटल्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले असता, त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे नमूद करीत अधिक बोलण्यास नकार दिला.