महाराष्ट्र निवडणूक 2019 : अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केला मोठा गौप्यस्फोट!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 04:57 PM2019-11-08T16:57:00+5:302019-11-08T17:14:49+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाला आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा विषय आपल्यासमोर चर्चिलाच गेला नव्हता. तसेच अशाप्रकारचे कुठलेली आश्वासन शिवसेनेला दिले गेले नव्हते, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
शिवसेनेशी युती करताना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याबाबत कुठलेही आश्वासन आम्ही दिले नव्हते, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवरून आक्रमक भूमिका घेतली होती. त्यातून शिवसेना आणि भाजपामध्ये सत्तावाटपावरून तिढा निर्माण झाला होता.
दरम्यान, आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजपामध्ये सत्तावाटपावरून निर्माण झालेला तिढा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याबाबतचे आश्वासन याबाबत मोठे विधान केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना महायुतीला १६० हून अधिक जागा मिळाल्या. त्यापैकी १०५ जागा एकट्या भाजपाला मिळाल्या होत्या. दुर्दैवाने आमच्या काही जागा कमी आल्या. त्याचदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन करण्याबाबत आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचा दावा केला. उद्धव ठाकरे यांचे हे विधान आमच्यासाठी धक्कादायक होते. जनतेने महायुतीला मतदान केले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे असे का म्हणाले असावेत असा प्रश्न आम्हाला पडला.''
''अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत म्हणाल तर अशाप्रकारचा कुठलाही मुद्दा माझ्यासमोर चर्चिला गेला नव्हता. तसेच युतीची घोषणा करतानाही याबाबत कुठलाही निर्णय झाला नव्हता. कदाचित उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये असे आश्वासन दिले गेले असावे, असे आम्हाला वाटले. म्हणून अमित शाह यांच्याकडे याबाबत विचारणा केली. मात्र त्यांनीही अशाप्रकारचे आश्वासन दिले नसल्याचे सांगितले,'' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.