Maharashtra SSC Result 2022 Live: दहावीच्या निकालात कोकण-कन्या सुस्साट...! राज्यात ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 11:02 AM2022-06-17T11:02:42+5:302022-06-17T11:24:30+5:30
Maharashtra SSC 10th Board Result today : राज्याचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून यंदाही कोकण विभागानं निकालात बाजी मारली आहे.
Maharashtra SSC MSBSHSE 10th result 2022 : राज्याचा इयत्ता १० वीचा निकाल जाहीर झाला असून दरवर्षी प्रमाणे यंदाची कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागातून सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. तर राज्याचा निकाल एकूण ९६.९४ टक्के इतका लागला आहे. आज सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेत दहावीच्या निकालाची सविस्तर माहिती दिली. आता दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पद्धतीनं पाहता येणार आहे.
उत्तीर्ण मुलींचा ९७.९६ टक्के तर मुलांचा ९६.०६ टक्के निकाल लागला आहे. २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
विभागानुसार लागलेले निकाल टक्केवारी...
पुणे: 96.96%
नागपूर: 97%
औरंगाबाद: 96.33%
मुंबई: 96.94%
कोल्हापूर: 98.50%
अमरावती: 96.81 %
नाशिक: 95.90%
लातूर: 97.27%
कोकण: 99.27%
निकालाची ठळक वैशिष्ट्ये
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,८४,७९० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,६८,९७७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १५,२१,००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.९४ आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ५४,१५९ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५२.३५१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी ४१,३९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ७९.०६ आहे.
सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्याथ्र्यांचा कोकण विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी ९९. २७ अशी सर्वाधिक असून सर्वात कमी उत्तीर्णतिची टक्केवारी नाशिक विभागाची ९५.९० अशी आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.९६ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०६ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा १.९० ने जास्त आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ८,१६९ दिव्यांग विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८,०२९ दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी ७,५७९ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.४० आहे. एकूण २४ विषयांचा निकाल १००% टक्के लागला आहे.
राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्याथ्यांपैकी ६,५०,७७९ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत ५,७०,०२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत २.५८,०२७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ४२.१७० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यातील २२,९२१ माध्यमिक शाळांतून १६,३८,९६४ विद्याथ्र्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२,२९० शाळांचा निकाल १००% लागला आहे.
यंदा राज्यात ९ विभागीय मंडळांमार्फत १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा झाली. १६,३९,१७२ विद्यार्थी या परीक्षेसाठी राज्यभरातून बसले होते. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील, निकालाची प्रत (प्रिंट) देखील घेता येईल.
कुठे पाहता येईल निकाल?
mahresult.nic.in
sscresult.mkcl.org
ssc.mahresults.org.in
पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. त्यानंतर पाच दिवसांत शुल्क जमा करून ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे.