नावांची मोडतोड फॅशन की...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 05:13 AM2019-08-12T05:13:36+5:302019-08-12T05:14:04+5:30
कल्याण शाळेतून आला. तेवढ्यात सोहम म्हणजेच सॅम त्याला कल्लू म्हणून आवाज देत होता. दोघेही त्यांचा मित्र कृष्णाकडे गेले आणि ‘क्रिश आहे का घरात?’ म्हणून त्याच्या बाबांना विचारले.
- अॅड. प्रार्थना सदावर्ते
कल्याण शाळेतून आला. तेवढ्यात सोहम म्हणजेच सॅम त्याला कल्लू म्हणून आवाज देत होता. दोघेही त्यांचा मित्र कृष्णाकडे गेले आणि ‘क्रिश आहे का घरात?’ म्हणून त्याच्या बाबांना विचारले. तेवढ्यात तेथे अक्षय आला, या दोघांनी त्याला अक्की म्हणून हाक दिली. बाजूच्या घरातील सुकन्या कृष्णाकडे तिच्या आईने केलेल्या आलेपाकच्या वड्या द्यायला आली होती. तिला कल्लूने सुक्कू म्हणत बोलावले. मग हे सगळे जण मैदानावर खेळायला गेले, तिथे संगीता म्हणजे म्युझिका, अमृता म्हणजे आमू आणि जेनिफर म्हणजे जेनी खेळत होत्या. ही मुलं गप्पा मारू लागली. शाळेत ज्या बाई खूप कर्णकर्कश आवाजात बोलायच्या, त्यांना फुटका रेडिओ. ज्या खूप जाड होत्या, त्यांना डिकी. ज्या लुकड्या होत्या, त्यांना काडी. ज्या दिसायला सुंदर होत्या, त्यांना चिकणमाती. जे सर खूप जाड आणि खुजे होते, त्यांना घमेलं. अशी नावं ठेवत ही मुलं बोलत होती. तिथून ओंकार चालला होता. त्याला ओम्या म्हणून सगळ्यांनी आवाज दिला. हा असा आपण आधुनिक आहोत, हे दाखविण्याचा आणि शॉर्टकटचा जमानाय खरं म्हणजे माणसांची नावं ही त्या व्यक्तीची ओळख असते. त्यामुळे त्या नावाला एक व्यक्तिगत मूल्यदेखील प्राप्त झालेलं असतं अन् व्यक्तीचं नाव उच्चारताना त्या व्यक्तीविषयीच्या भावनाही जाणवतात. शिवाय ओंकार म्हणताना गणेशाची आराधना होते, अमृता म्हणताना मांगल्यदायी वाटतं. कल्याण म्हणताना आपल्यालाच संतुष्ट वाटतं, पण तरीही आपण नावांचे छोटे फॉर्म उगीचच करतो. कोणाच्या दिसण्यावरून त्याला नाव देऊन संबोधत असू, तर ते आपल्या विचारांतील न्यून आहे. तसं पाहिलं, तर एखाद्याचं नाव घेऊन त्याला हाक मारताना हाक मारणाऱ्याची संस्कृती आणि संस्कार पण दिसतातच की...!
(लेखिका समुपदेशिका आणि
वकील आहेत.)
prayer1@ymail.com