Sandip Deshpande: फरार संदीप देशपांडे, संतोष धुरींना मोठा दिलासा; एका अटीवर अटकपूर्व जामिन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 02:16 PM2022-05-19T14:16:21+5:302022-05-19T14:47:26+5:30
Raj Thackeray Loudspeaker Row: राज ठाकरेंनी ४ मे पासून भोंग्यांवरून हनुमान चालिसा लावण्याबाबत दिलेला अल्टीमेटम संपला होता. यामुळे पोलिसांनी मनसे नेत्यांनी धरपकड सुरु केली होती. संदीप देशपांडे आणि धुरी यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांच्या तावडीतून सुटून पलायन करणाऱ्या मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरींना आज मोठा दिलासा मिळाला आहे. या दोघांवर महिला पोलीस अधिकाऱ्याला जखमी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
राज ठाकरेंनी ४ मे पासून भोंग्यांवरून हनुमान चालिसा लावण्याबाबत दिलेला अल्टीमेटम संपला होता. यामुळे पोलिसांनी मनसे नेत्यांनी धरपकड सुरु केली होती. यात मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे ठाकरेंच्या बंगल्याबाहेर आले असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतू त्यांनी पोलिसांना झटका देऊन कारमध्ये बसून पलायन केले होते. या साऱ्या गदारोळात महिला पोलीस अधिकारी रस्त्यावर आदळली होती. यामुळे पोलिसांनी या दोघांविरोधात ३५३ कलमाद्वारे गुन्हा दाखल केला होता.
Mumbai Sessions Court also allows bail to Rohit Vaishya, driver of Sandeep Deshpande who was arrested by Mumbai Police for helping Deshpande to flee.
— ANI (@ANI) May 19, 2022
Also, arrested MNS leader Pramukh Santosh Sali has been allowed bail in the same case.
अजामिनपात्र गुन्हा असल्याने देशपांडे गायब झाले होते. तर देशपांडेच्या कारच्या चालकाला अटक करण्यात आली होती. संदीप देशपांडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या साऱ्या प्रकरणावर संदीप देशपांडे, संतोष धुरींना मोठा दिलासा मिळाला आहे.
संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. दर महिन्याच्या १ आणि २३ तारखेला पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याची अट यामध्ये घालण्यात आली आहे. त्यांच्या चालकाला देखील जामिन देण्यात आला आहे.
देशपांडेंनी सांगितला होता पोलिसी प्रोटोकॉल-
महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा, त्यामुळे त्या पडून जखमी झाल्याचा आरोप देशपांडेवर केला जात आहे. त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. 'आम्ही तिथून निघून गेल्यावर टीव्हीवरच्या बातम्या पाहिल्या. धक्काबुक्कीत महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं दाखवत होते. मात्र माझा धक्का त्या महिला पोलिसाला लागलाच नाही. फुटेजमध्ये तसं स्पष्ट दिसत आहे. माझ्याभोवती ७ ते ८ पुरुष पोलीस अधिकारी होते. पुरुष अधिकारी उपस्थित असताना एका पुरुषाला महिला अधिकारी पकडायला जात नाही, हा प्रोटोकॉल आहे,' याची आठवणही त्यांनी करून दिली होती.