Breaking: राज्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 06:29 PM2020-12-21T18:29:42+5:302020-12-21T18:41:29+5:30
Corona Virus News, Uddhav Thackrey: राज्यात कोरोना आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर तातडीची बैठक बोलावली होती. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा (स्ट्रेन) हाहाकार लक्षात घेऊन खबरदारी म्हणून राज्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. राज्यात कोरोना आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर तातडीची बैठक बोलावली होती. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतीश पाटील आणि शंभूराजे देसाई उपस्थित आहेत. यासोबतच अतिरिक्त सचिव सिताराम कुंटे, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह, कायदा-सुव्यवस्था अतिरिक्त आयुक्त विश्वास नांगरे-पाटील देखील बैठकीला हजर होते.
२५ ते ३१ डिसेंबर या काळातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. कोरोनाचा काळ असताना ख्रिसमस आणि नववर्ष स्वागतासाठी निर्बंध घालण्यात आले आहेतनववर्ष स्वागतासाठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स संघटनेने मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी सरकारकडे केली होती. मात्र, रात्रीच्या संचारबंदीमुळे सारे बंद राहणार आहे.
उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत ते लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
ब्रिटन मध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणुची घातकता पुढील काही दिवसात कळेल त्यामुळे आजपासूनच राज्यात यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
Maharashtra government has also made 14 days quarantine mandatory to all who are travelling from Europe and all Middle East countries
— ANI (@ANI) December 21, 2020
संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पीटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
अन्य देशांमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना होम क्वारंटाईन केले जाईल. युरोपीयन देश, मध्य-पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांची तपसाणी करणाऱ्या विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
All passengers coming from Europe and Middle East will have to mandatorily undergo 15 days institutional quarantine. Passengers coming from other international destinations other than Europe and the Middle East will have to undergo home quarantine: Maharashtra Government
— ANI (@ANI) December 21, 2020
युरोप आणि मध्य-पूर्व देशातून प्रवास केलेल्यांनी देशांतर्गत विमान प्रवास केला असेल तर त्यांची माहिती त्यांनी देणं गरजेचे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकची काळजी घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.