Maharashtra Kesari Result: सोलापूरचा वेताळ ठरला महाराष्ट्र केसरी; युवराज राक्षेचे काय झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 21:46 IST2025-03-30T21:45:18+5:302025-03-30T21:46:10+5:30

Vetal Shelke Maharashtra Kesari result News: विजेता वेताळ शेळके याला खांद्यावर घेऊन मिरवणूक काढण्यात आली. वेताळ हा सोलापूरचा आहे. 

Breaking: Vetal Shelke won Maharashtra Kesari; Received the silver mace from Sharad Pawar | Maharashtra Kesari Result: सोलापूरचा वेताळ ठरला महाराष्ट्र केसरी; युवराज राक्षेचे काय झाले?

Maharashtra Kesari Result: सोलापूरचा वेताळ ठरला महाराष्ट्र केसरी; युवराज राक्षेचे काय झाले?

- अफरोजखान पठाण

लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत (जि. अहिल्यानगर) : येथे आयोजित ६६व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अंतिम सामना सोलापूरचा वेताळ शेळके आणि मुंबईचा पृथ्वीराज पाटील यांच्यात रंगला. शेळके याने आक्रमक खेळ करीत पाटील याच्यावर ७ गुणांनी मात करत केसरी किताब आणि मानाची गदा पटकावली. या कुस्तीत पाटील याला अवघा एक गुण मिळविता आला. तो उपमहाराष्ट्र केसरी ठरला. कुस्ती जिंकल्यानंतर वेताळ शेळके याच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला.

यावेळी ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मंत्री जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, खासदार नीलेश लंके, आमदार रोहित पवार, धैर्यशील मोहिते, आमदार जितेंद्र आव्हाड, महादेव जानकर, किशोर दराडे, राजाभाऊ खरे, हेमंत ओगले, नारायण आबा पाटील, राजेंद्र फाळके, समरजीत घाडगे, कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि आमदार रोहित पवार मित्रमंडळ कर्जत-जामखेडच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. येथील संत सद्गुरू गोदड महाराज क्रीडानगरीत रविवारी सायंकाळी केसरीची अंतिम लढत पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. प्रत्येक लढतीला मैदानात तुतारी आणि हलगीचा निनाद घुमत होता.
------

शिवराजच्या लढतीकडे लागले होते लक्ष
अहिल्यानगरमध्ये फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर संघ आणि जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्यातर्फे आयोजित ६७व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीत पंचाच्या निकालावर आक्षेप घेत, शिवराज राक्षे याने पंचांना लाथ मारली होती. या घटनेची राज्यभर चर्चा झाली. कर्जत येथे आयोजित स्पर्धेत शिवराज सहभागी झाला होता. त्यामुळे त्याच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष्य लागून होते. दरम्यान, अंतिम लढतीच्या आधी उपांत्य फेरीत गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षे आणि मुंबईच्या पृथ्वीराज पाटील यांच्यात कुस्ती रंगली. या कुस्तीत पृथ्वीराज याने शिवराजवर मात केली. यावेळी शिवराज याने तांत्रिक बाबी तपासण्याची मागणी केली होती. मात्र, मॅटवरील पंचाचा निकाल कायम ठेवण्यात आला.

मोहोळ, मोहिते कुटुंबीयांकडून गदा

महाराष्ट्र केसरी विजेता वेताळ शेळके याला दिवंगत मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ अशोक मोहोळ यांनी मानाची गदा दिली, तर उपमहाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यास मोहिते कुटुंबीयांच्या वतीने धवलसिंह मोहिते यांनी गदा दिली.
 

Web Title: Breaking: Vetal Shelke won Maharashtra Kesari; Received the silver mace from Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.