रेल्वे ट्रॅकवरील गुन्ह्यांना ब्रेक
By admin | Published: May 18, 2016 02:33 AM2016-05-18T02:33:17+5:302016-05-18T02:35:16+5:30
मुंबई शहर व उपनगरीय रेल्वेमार्गावरून प्रवास करताना अनेक प्रवाशांचा मुद्देमाल चोरीला जातो
मुंबई : मुंबई शहर व उपनगरीय रेल्वेमार्गावरून प्रवास करताना अनेक प्रवाशांचा मुद्देमाल चोरीला जातो आणि त्यानंतर सतर्क नसलेल्या प्रवाशांना आठवण होते ती रेल्वे पोलिसांची (जीआरपी). एखादी महत्त्वाची वस्तू चोरीला गेल्यानंतर प्रवाशांकडून रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली जाते आणि त्याची दखल घेत पोलिसांकडून तत्काळ तपास करून गुन्हेगारांना जेरबंद केले जाते.
रेल्वेतील गुन्हेगारीला रेल्वे पोलिसांकडून गेल्या काही वर्षांत ब्रेक लावण्यात येत आहे. २0१४ (जानेवारी ते डिसेंबर) ते २0१६ (जानेवारी ते एप्रिल) या काळात रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (क्राइम ब्रँच) केलेल्या कारवाईत तब्बल ६९0 अट्टल गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ३ कोटी ७ लाख ३१२ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
२0१५ सर्वाधिक गुन्हेगारांना अटक
२0१५मध्ये विविध गुन्ह्यांत ३१९ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. २0१५च्या जानेवारीत ३0, एप्रिल महिन्यात ४२ तर मे, जून, जुलै आणि सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी २८ गुन्हेगारांची धरपकड केली आहे. २0१६च्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत प्रत्येकी ३0 तर एप्रिल महिन्यात २९ गुन्हेगारांना पकडले आहे.
रेल्वेतून प्रवास करताना होणाऱ्या चोऱ्या आणि अन्य गुन्ह्यांना आमच्याकडून आळा घातला जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना आम्ही केल्या आहेत. गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, गुन्हेगारांनाही पकडण्यात यश आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे.
- विनोद चव्हाण, लोहमार्ग पोलीस, क्राइम ब्रँच- वरिष्ठ पोलीस निरीक्षक